नवी दिल्ली | New Delhi | वृत्तसंस्था
२६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील (Mumbai Terrorist Attack) आरोपी तहव्वूर राणाच्या (Tahawwur Rana) अमेरिकेतून (America) प्रत्यार्पणासाठी सर्व कायदेशीर औपचारिकता पूर्ण झाल्या आहेत. एका खास विमानाने त्याला भारतात (India) आणण्यात येणार असून आज पहाटे भारतात आणले जाईल. या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत.
याकाळात त्यांच्यासोबत गुप्तचर आणि तपास अधिकाऱ्यांची एक विशेष टीम असेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. तहव्वुर राणाला आज एनआयए (NIA) न्यायालयात त्याच्या कोठडीसाठी हजर केले जाईल. मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तहव्वूर राणाविरुद्ध दिल्लीत एनआयएचा गुन्हा दाखल आहे. त्यामुळे राणाला प्रथम दिल्लीला (Delhi) आणले जाईल आणि येथील एनआयए न्यायालयात हजर केले जाईल. मुंबई गुन्हे शाखा (Mumbai Crime Branch) नंतर त्याची कस्टडी घेईल.
अमेरिकन न्यायालयाच्या (American Court) सूचनांनुसार, तहव्वूर राणासाठी दिल्ली आणि मुंबईच्या तुरुंगांमध्ये गुप्तपणे विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. भारतात आणल्यानंतर, राणाला सुरुवातीचे काही आठवडे राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) कोठडीत ठेवण्यात येईल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. ही संपूर्ण कारवाई एनएसए अजित डोवाल, एनआयए आणि गृह मंत्रालयाच्या काही उच्च अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली होत आहे.
दरम्यान, तत्पूर्वी, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने तहव्वूर राणाची याचिका (Petition) फेटाळून लावली आहे. ज्यामध्ये त्याने त्याच्या प्रत्यार्पणाला स्थगिती देण्याची मागणी केली होती. याचिकेत तहव्वूर राणा यांनी म्हटले होते की, जर मला भारतात प्रत्यार्पण केले तर माझा छळ केला जाईल. मी भारतात जास्त काळ टिकू शकणार नाही.
एनआए करणार अटक
भारतात आणल्यानंतर सर्वात आधी तहव्वूर राणाला एनआए अटक करणार आहे. यानंतर त्याला एनआयएच्या मुख्यालयात आणले जाईल. येथे त्याची वैद्यकीय तपासणी केली जाईल. या प्रक्रिया झाल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दिल्ली विमानतळावर येताच त्याला एनआयएच्या मुख्यालयात आणले जाईल. दिल्ली पोलिसांचे स्पेशल सेलचे SWAT कमांडो त्याला घेऊन जातील.
डोनाल्ड ट्रम्प यांनीच केली होती घोषणा
तहव्वूर राणाला ताब्यात घेण्यासाठी भारत सरकार अनेक वर्षांपासून प्रयत्न करत होते. राणा याचे संबंध लश्कर ए तोएबा आणि डेव्हिड हेडलीशीही आहेत. राणाने अमेरिकी कायद्यांचा उपयोग केला. परंतु, यात त्याला यश मिळाले नाही. फेब्रुवारी महिन्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले होते की आमच्या प्रशासनाने जगातील सर्वात वाईट व्यक्ती तहव्वूर राणाला भारताच्या ताब्यात देण्यास मंजुरी दिली आहे.