Saturday, October 24, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमुंबईत बॉम्बस्फोटांच्या धमकीने खळबळ; शाळा आणि महालक्ष्मी रेसकोर्स लक्ष्यावर, ई-मेलमध्ये ‘खलिस्तान झिंदाबाद’चा...

मुंबईत बॉम्बस्फोटांच्या धमकीने खळबळ; शाळा आणि महालक्ष्मी रेसकोर्स लक्ष्यावर, ई-मेलमध्ये ‘खलिस्तान झिंदाबाद’चा उल्लेख

मुंबई | Mumbai
देशाची आर्थिक राजधानी मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या धमकीमुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. मुंबईच्या महापौर ऋतु तावडे यांच्या कार्यालयाला शुक्रवारी, २३ ऑक्टोबर रोजी धमकीचा ई-मेल प्राप्त झाला. या ई-मेलमध्ये मुंबईतील एका शाळेवर ग्रेनेड हल्ला करण्याची तसेच महालक्ष्मी रेसकोर्स परिसरात बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या ठिकाणांसह बॉलिवूडचे बिग बी अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन यांना धमकीचा ई – मेल असून यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. अभिनेते अमिताभ बच्चन, पंजाबी गायक – अभिनेता दिलजीत दोसांझ, मुंबईच्या महापौर रितू तावडेंचे कार्यालय, दादरमधील तीन ते चार शाळा अशांना धमकीचा मेल आला आहे. ई-मेलमध्ये ‘खलिस्तान झिंदाबाद’ अशा घोषणांचाही उल्लेख करण्यात आला आहे. या घटनेमुळे मुंबईत खळबळ उडाली असून, पोलिसांकडून धमकीच्या स्रोताचा शोध घेतला जात आहे.

शाळेवर ग्रेनेड हल्ला, रेसकोर्सवर स्फोटाची धमकी
प्राथमिक वृत्तानुसार, धमकीच्या ई-मेलमध्ये ३१ ऑक्टोबर रोजी मुंबईतील एका शाळेवर ग्रेनेड हल्ला करण्याचा उल्लेख आहे. तसेच २७ नोव्हेंबर रोजी महालक्ष्मी रेसकोर्स परिसरात बॉम्बस्फोट घडवून आत्मघाती हल्ला करण्याची धमकी देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

या धमकीच्या पार्श्वभूमीवर संबंधित ठिकाणांवरील सुरक्षा व्यवस्थेची तपासणी करण्यात येत आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीची ओळख अद्याप अधिकृतरीत्या स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे ई-मेलमधील दाव्यांची सत्यता आणि त्यामागील उद्देश तपासातून स्पष्ट होणार आहे.

मुंबई महापौर कार्यालयाला यापूर्वीही धमकीचा ई मेल प्राप्त झाला होता. १० जून २०२६ रोजी महापौर कार्यालय, मुख्यमंत्री कार्यालय आणि बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजसह काही महत्त्वाच्या ठिकाणी स्फोट घडवण्याची धमकी देणारे ई-मेल प्राप्त झाला होता. त्यावेळी सुरक्षा पथकांनी कार्यालयाची तपासणी केली असता कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नव्हती. मात्र, त्यानंतर महापालिकेतील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्यात आली. त्यांनतर पुन्हा शुक्रवार, २३ ऑक्टोबर रोजी सकाळी धमकीचा संदेश प्राप्त झाला. हा ई-मेल महापौर रितू राजेश तावडे आणि उपमहापौर संजय शंकर घाडी यांना पाठविण्यात आला आहे.

बॉम्ब ब्लास्ट मेयर ऑफिस
‘मुंबई बॉम्बे बोलेगा’, ‘खलिस्तान झिंदाबाद’ अशा घोषणांनी सुरू होणाऱ्या या ई-मेलचा विषयच बॉम्ब ब्लास्ट मेयर मुंबई ऑफिस असा आहे. ई-मेलमध्ये ३१ ऑक्टोबर रोजी ग्रेनेड हल्ल्याची धमकी देण्यात आली असून, १९८४ मधील शीखविरोधी हिंसाचाराचा संदर्भ देत आक्षेपार्ह आणि धमकीवजा मजकूर लिहिण्यात आला आहे. त्यानंतर २७ नोव्हेंबर रोजी महालक्ष्मी रेसकोर्स येथे बॉम्बस्फोट करून आत्मघाती हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे मुंबईच्या महापौरांचे कार्यालय दुपारी 3.11 वाजता उडवू अश्या धमकीचा ई-मेल आल्यानंतर दादरमधल्या शाळांना सुट्टी दिली गेली. विद्यार्थ्यांना घरी पाठवून पोलिसांकडून शाळेत तपास मोहीम राबवण्यात आली आहे. या धमकीच्या संदेशात खलिस्तान चळवळ आणि इतर काही संशयित संघटनांचा थेट उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे केवळ खोडसाळपणा म्हणून याकडे न पाहता सुरक्षा यंत्रणांनी याला अत्यंत गांभीर्याने घेतले असून शाळा आणि रेसकोर्स परिसराची सुरक्षा तातडीने वाढवण्यात आली आहे.

धमकीचा ई-मेल मिळताच सुरक्षा यंत्रणांनी तत्काळ शोधमोहीम राबवली. प्रमाणित कार्यपद्धतीनुसार ई-मेल मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांनी कोणतीही हलगर्जी न दाखवता तत्काळ मानक कार्यपद्धती (SOP) लागू केली आहे. बॉम्बशोधक व नाशक पथक (बीडीडीएस), श्वानपथक आणि स्थानिक पोलिसांच्या पथकांनी तातडीने संभाव्य संशयित ठिकाणी जाऊन कसून शोधमोहीम राबवली. प्राथमिक तपासणीत कोणत्याही ठिकाणी संशयास्पद वस्तू किंवा स्फोटके आढळून आलेली नाहीत. अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन मुंबई पोलिसांनी नागरिकांना शांततेचे आणि अफवांवर अजिबात विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.

ताज्या बातम्या

बनावट नोटा बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; चार जण ताब्यात

0
​त्र्यंबकेश्वर | वार्ताहर Trimbakeshwar त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तळवाडे शिवारात असलेल्या एका रिसॉर्टमध्ये बनावट नोटा तयार करून फसवणूक करण्याच्या तयारीत असलेल्या एका टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश...