मुंबई । Mumbai
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दक्षिण मुंबईतील गजबजलेल्या चर्चगेट स्टेशनजवळील आयकर विभागाच्या (इन्कम टॅक्स) कार्यालयात अचानक भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दुपारी लागलेल्या या आगीमुळे इमारतीतून काळ्या धुराचे मोठमोठे लोट बाहेर पडू लागले असून संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या आणि पोलीस ताफा तातडीने घटनास्थळी दाखल झाला असून आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सोमवारी दुपारी चर्चगेट येथील आयकर भवनाच्या बेसमेंटमधील रूम नंबर १० मध्ये शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली. सुरुवातीला वायर जळण्याचा उग्र वास आला आणि काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले. आग लागल्याचे समजताच इमारतीत उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड धावपळ उडाली. सुदैवाने बहुतांश कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बेसमेंटमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यानंतर धुराचे साम्राज्य पसरले. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले, “प्रथम वायर जळल्याचा वास आला आणि धूर दिसू लागला. आगीचा भडका उडाल्याने सर्वजण बाहेर पळाले. आगीची तीव्रता जास्त असली तरी सुदैवाने ती वरच्या मजल्यांवर पसरली नाही.”
आग लागल्यानंतर इमारतीच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर काही नागरिक घाबरून अडकून पडले होते. यात कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त अन्य नागरिकांचाही समावेश असल्याचे समजते. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने शिड्यांच्या साहाय्याने इमारतीत अडकलेल्या लोकांचे रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले असून त्यांना सुरक्षित बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
अग्निशमन दलाच्या ८ गाड्या, पाण्याचे टँकर्स आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवा घटनास्थळी हजर आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस प्रशासनाने आयकर भवनाभोवतीचा परिसर सील केला असून वाहतूक व गर्दीवर नियंत्रण मिळवले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा कोणी गंभीर जखमी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, इमारतीतील महत्त्वाच्या कागदपत्रांचे आणि साहित्याचे मोठे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.




