मुंबई | Mumbai
मुंबईतील पवई (Powai) परिसरात 23 वर्षीय एअर होस्टेसची (Air Hostess) हत्या (Murder) झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पवई पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एन जी को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या इमारतीमध्ये संबंधित एअर होस्टेसचा मृतदेह आढळून आला.
पवई पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी इमारतीत साफसफाईचं काम करणाऱ्या इसमाला ताब्यात घेतलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रूपल ओगरे (वय २३, मूळगाव रायपूर, छत्तीसगड) असं या एअर होस्टेसचं नाव आहे. हत्येची घटना घडली तेव्हा रुपल घरी एकटीच होती कारण तिची बहिण आणि मित्र हे दोघेही आपल्या गावी गेले होते. पवई पोलीस आणि गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास तातडीने सुरू केला.
दरम्यान या प्रकरणाचा उलगडा झाला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. तो सफाई कर्मचारी असून, अद्याप पोलिसांनी त्याचे नाव जाहीर केले नाही. तर याआधी चर्चगट परिसरातील एका वसतीगृहातही एका कर्मचाऱ्यानेच विद्यार्थिनीची हत्या केल्याची घटना घडली होती हे विशेष.