Monday, September 14, 2026
Homeमहाराष्ट्रगणेशोत्सवासाठी मुंबईहून रत्नागिरीला जाणाऱ्या वाहनाचा भीषण अपघात, 10 जण जखमी

गणेशोत्सवासाठी मुंबईहून रत्नागिरीला जाणाऱ्या वाहनाचा भीषण अपघात, 10 जण जखमी

मुंबई । Mumbai

मुंबईहून कोकणातील आपल्या गावी निघालेल्या चाकरमान्यांच्या आनंदावर अपघाताचे भीषण सावट पसरले आहे. रविवारी सकाळी राजापूर तालुक्यातील हातिवले येथे भाविकांच्या वाहनाला झालेल्या भीषण अपघातात ८ ते १० जण गंभीर जखमी झाले आहेत.

- Advertisement -

गणेशोत्सव अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपला असून सोमवारी १४ सप्टेंबर रोजी घरोघरी गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. या सणासाठी कोकणातील आपल्या मूळ गावी जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील कुणकावळे येथील १५ प्रवासी फोर्स अर्बेनिया वाहनाने मुंबईहून निघाले होते. रविवारी सकाळी हे वाहन राजापूर तालुक्यातील हातिवले येथील अंकिता पॅलेससमोर आले असता, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात घडला.

अपघाताची तीव्रता इतकी भयानक होती की, वाहनाचा चक्काचूर झाला असून दृश्य पाहणाऱ्यांच्या अंगावर काटा येत होता. या वाहनात १५ प्रवासी सवार होते, त्यापैकी ८ ते १० जण गंभीर जखमी झाले आहेत. सुदैवाने, या दुर्घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे प्राथमिक वृत्तावरून स्पष्ट झाले आहे. स्थानिकांची देवदूतासारखी मदत अपघाताचा भीषण आवाज होताच परिसरातील स्थानिक तरुणांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळाकडे धाव घेतली.

तरुणांनी तातडीने मदतकार्य सुरू करत गाडीत अडकलेल्या जखमी प्रवाशांना बाहेर काढले आणि उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच राजापूर पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी वाहतूक सुरळीत करत अपघाताचा पंचनामा करण्याचे काम हाती घेतले आहे. अपघाताचे नेमके कारण काय होते, याचा तपास पोलीस करत आहेत.

महामार्गावर वाहतूक कोंडी आणि विलंबाचे सावटगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, पुणे आणि नाशिक येथून लाखो चाकरमनी कोकणाच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहनांची गर्दी झाली असून इंदापूर आणि माणगाव परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. १० किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी प्रवाशांना २ ते ३ तासांचा कालावधी लागत आहे. दुसरीकडे कोकणात जाणाऱ्या अनेक एक्स्प्रेस गाड्याही विलंबाने धावत असल्याने चाकरमान्यांचे हाल होत आहेत.

ताज्या बातम्या