मुंबई | Mumbai
नगरपरिषद निवडणुकी दरम्यान महाडमधल्या राड्यावरून पोलीस अजूनही मंत्री भरत गोगावले यांच्या मुलाला अटक करू शकले नाहीत, यावरून मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांवर तसेच गृहमंत्री तथा मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री इतके असहाय्य आहेत की त्यांना याप्रकरणी काहीही करता येत नाही असे निरीक्षण कोर्टाने नोंदवले. मुख्यमंत्री आणि भरत गोगावलेंकडून निर्देश घ्या, अशा सूचना कोर्टाने राज्य सरकारला दिल्या आहेत.
महाड नगर परिषद निवडुकांदरम्यान राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली होती. नवे नगर परिसरात मतदान सुरू असताना अचानक शिवसेना आणि राष्ट्रावादीतील कार्यकर्त्यांच्या गटात हाणामारी झाली. माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप गटाचे नेते सुशांत जाबरे आणि शिंदेंच्या शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. या राड्याप्रकरणी भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले, पुतण्या महेश गोगावले यांच्यासह माजी आमदार माणिक जगताप यांचे पुत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्रीयांश जगताप यांच्यावरही गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश कोर्टाने सरकारला दिले आहेत.
महाड राड्याप्रकरणी मंत्र्याच्या मुलासह इतर आरोपींना पकडण्यात पोलिसांना अपयश आले आहे. सरकार कोणालाही २४ तासात अटक करू शकते. पण जेव्हा त्यांना अटक करायची नसते तेव्हा ते अशी प्रतिज्ञापत्रे सादर करतात अशा शब्दात उच्च न्यायालयाने फटकारले.
महाराष्ट्रातील कायद्याचे राज्य प्रतिकूलरित्या प्रभावित झाले आहे. माननीय मुख्यमंत्री इतके असहाय्य आहेत की त्यांना त्याबाबत काहीही करता येत नाही अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.




