मुंबई | Mumbai
इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) क्रिकेट स्पर्धेमध्ये आज (रविवारी) चेन्नई येथील एम ए चिदंबरम स्टेडियमवर ५ वेळच्या आयपीएल विजेत्या मुंबई इंडियन्स आणि ५ वेळच्या आयपीएल विजेत्या चेन्नई सुपरकिंग्ज संघांमध्ये (Mumbai Indians vs Chennai Super Kings ) सामना खेळविण्यात येणार आहे. हा सामना चेन्नई येथील एम ए चिदंबरम स्टेडियमवर सायंकाळी ७:३० वाजता खेळविण्यात येणार आहे.
या सामन्यात ऋतुराज गायकवाडकडे ( Ruturaj Gaikwad) चेन्नई सुपरकिंग्ज संघाचे कर्णधारपद असणार आहे. तर मुंबई इंडियन्स संघाचा नियमित कर्णधार हार्दिक पांड्या या सामन्यात खेळू शकणार नाही. त्यामुळे संघाचे कर्णधारपद सूर्यकुमार यादवकडे (Suryakumar Yadav) असणार आहे. आयपीएल २०२४ मध्ये षटकांची गती वेळेवर पूर्ण न केल्यामुळे हार्दिक पांड्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे.विशेष म्हणजे आयपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये मुंबई इंडियन्स संघाने ११ सलामी सामने खेळले असून, सर्व सामने गमावले आहेत. त्यामुळे आपली पराभवाचा मालिका खंडित करण्याची संधी मुंबई इंडियन्स संघाकडे असणार आहे.
मुंबई इंडियन्स विरूध्द चेन्नई सुपरकिंग्ज संघांमध्ये ३९ सामने खेळविण्यात आले असून, हेड टू हेड आकडेवारी पाहिल्यास मुंबई इंडियन्स ने कायमच चेन्नई सुपरकिंग्ज संघावर वरचष्मा राखला आहे. चेन्नई सुपरकिंग्ज ने १८ तर मुंबई इंडियन्स ने २१ सामने जिंकले आहेत. तर दोन्ही संघांमध्ये चेन्नई येथील एम ए चिदंबरम स्टेडियमवर ७ सामने खेळविण्यात आले असून, मुंबई इंडियन्सने ५ तर चेन्नई सुपरकिंग्जने २ सामन्यात बाजी मारली आहे. मात्र अखेरच्या ५ सामन्यांच्या निकालावर (Result) नजर टाकल्यास चेन्नई सुपरकिंग्जने ३ तर मुंबई इंडियन्सने २ सामन्यात विजय संपादन केला आहे.