मुंबई । Mumbai
लाडक्या बाप्पाच्या आगमनाने संपूर्ण मुंबईनगरी भक्ती, उत्साह आणि आनंदात न्हाऊन निघाली आहे. लालबाग, परळ, काळाचौकी आणि गिरगावातील रस्त्यांवर अथांग जनसागर उसळला आहे. मात्र, याच उत्सवी वातावरणाला अचानक काळोखाची किनार लागली आहे. काळाचौकी येथील ‘महागणपती’ उत्सव मंडळाच्या मंडपाबाहेर मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या एका अत्यंत दुर्दैवी आणि अंगावर काटा आणणाऱ्या दुर्घटनेने संपूर्ण मुंबई हादरली आहे. पिण्याच्या पाण्याच्या स्टॉलवर झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे विजेचा जोरदार धक्का लागून एका ८ वर्षांच्या चिमुकलीसह ३३ वर्षांच्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर इतर चार भाविक गंभीर जखमी झाले आहेत.
गणेशोत्सवाचा शनिवारचा दिवस असल्याने आणि घरगुती गणपती विसर्जन पार पडल्यानंतर भक्तांनी लालबाग-काळाचौकी परिसरातील मोठमोठे देखावे आणि बाप्पाच्या दर्शनासाठी अभूतपूर्व गर्दी केली होती. काळाचौकी येथील दत्ताराम लाड मार्गावरील ‘महागणपती’ उत्सव मंडळाच्या प्रवेशद्वाराजवळ रात्रीच्या सुमारास प्रचंड गर्दी होती. भक्तांच्या सोयीसाठी या प्रवेशद्वाराजवळ तात्पुरत्या स्वरूपात पिण्याच्या पाण्याचा स्टॉल उभारण्यात आला होता. मध्यरात्री सुमारे २ वाजून ४२ मिनिटांच्या सुमारास या पिण्याच्या पाण्याच्या स्टॉलमध्ये अचानक विद्युत प्रवाह पसरला आणि तेथे पाणी पिण्यासाठी थांबलेल्या भक्तांना विजेचा तीव्र धक्का बसला.
काही क्षणांतच या ठिकाणी किंचाळ्या आणि धावपळ सुरू झाली. ऐन गर्दीच्या वेळी विजेचा झटका बसल्याने परिसरात मोठा गोंधळ आणि खळबळ उडाली. या अपघातात एकूण सहा जण गंभीररीत्या होरपळले व जखमी झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून उपस्थितांनी तातडीने मदतकार्य सुरू केले आणि पोलिसांना तसेच अग्निशमन दलाला माहिती दिली.
मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत प्रथम येथील मुख्य वीज पुरवठा खंडित केला. सुरक्षेचा उपाय म्हणून संपूर्ण परिसर तत्काळ सील करण्यात आला. जखमी झालेल्या सहा जणांना तातडीने उपचारासाठी जवळच्या मसिना आणि ग्लोबल रुग्णालयात हलवण्यात आले.
मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच ८ वर्षांच्या रागिणी घनश्याम यादव या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी तिला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. या घटनेच्या काही वेळानंतर सुजाता (वय ३३ वर्षे) या महिलेचाही उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली, ज्यामुळे या दुर्घटनेतील मृतांची संख्या दोनवर पोहोचली आहे.
सध्या मसिना रुग्णालयात तीन तरुणांवर उपचार सुरू असून, किरण अकबर नाईक (१९ वर्षे), तन्वी नरेश हांडे (१९ वर्षे) आणि साहिल संदीप तारे (१९ वर्षे) अशी त्यांची नावे आहेत. सुदैवाने या तिघांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. तर रुही सिंह (वय १२ वर्षे) या चिमुकलीची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर ग्लोबल रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (ICU) वैद्यकीय तज्ज्ञांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.
या दुर्घटनेनंतर ‘बेस्ट’ (BEST) प्रशासनाचे अधिकारी, काळाचौकी पोलीस आणि मीटर इन्स्पेक्टर यांनी तातडीने घटनास्थळी (दिग्विजय मिल चाळ, पोल क्रमांक DLM-14) भेट देऊन सखोल पाहणी केली. गणेशोत्सवातील तात्पुरती विद्युत रोषणाई आणि थंड पाण्याच्या स्टॉलसाठी लावण्यात आलेल्या तात्पुरत्या मीटरची (मीटर क्र. M217392) तपासणी करण्यात आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक वायरमनने सुरवातीलाच MCB आणि मुख्य वायरिंगचा संपर्क तोडला होता. सुरक्षेचा उपाय म्हणून या परिसरातील वीज पुरवठा सध्या अंशत: बंद ठेवण्यात आला आहे.




