मुंबई । Mumbai
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाच्या महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी, सत्तेचे समीकरण आणि महापौरपदाचा सस्पेन्स आता अधिकच गडद झाला आहे. निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना शिंदे गटाने थेट मुंबईच्या महापौरपदावर आपला दावा ठोकला असून, राजकीय हालचालींना वेग आला आहे. दरम्यान, आपले नगरसेवक फुटू नयेत यासाठी खबरदारी म्हणून शिंदे गटाने शनिवारी रात्रीच आपल्या सर्व नवनियुक्त नगरसेवकांना मुंबईतील एका आलिशान हॉटेलमध्ये हलवले आहे.
महापौरपदावरून महायुतीत रस्सीखेच सुरू असतानाच, ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या विधानाने खळबळ उडवून दिली आहे. मुंबईचा महापौर हा शिवसेनेचाच व्हावा, अशी आमची ठाम इच्छा असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. विशेष म्हणजे, यासंदर्भात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये फोनवरून चर्चा झाल्याचा मोठा दावा संजय राऊत यांनी केला आहे. या दोन भावांमधील चर्चेमुळे मुंबईच्या राजकारणात आता नवीन ‘पडद्यामागच्या’ हालचाली सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी भाजपवर सडकून टीका केली. “मुंबईत भाजपचा महापौर नको, ही केवळ आमचीच नाही तर सर्वांचीच भूमिका आहे,” असे ते म्हणाले. एकनाथ शिंदे यांच्या महापौरपदाच्या मागणीवर टोला लगावताना राऊत म्हणाले की, “शिंदे यांचा पक्ष हे भाजपचे अंगवस्त्र आहे. त्यांचे प्रमुख अमित शहा आहेत, त्यामुळे ते त्यांच्याकडे मागणी करतील. पण देवेंद्र फडणवीस ही मागणी मान्य करणार नाहीत, अशी माझी माहिती आहे.”
शिंदे गटाने नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवल्यावरूनही त्यांनी कडाडून टीका केली. ज्यांनी स्वतः आमदार फोडले, त्यांना आता स्वतःचे नगरसेवक कोंडून ठेवावे लागत आहेत, हे दुर्दैव असल्याचे ते म्हणाले. “आमदारांना ते सुरतला घेऊन गेले होते, मग नगरसेवकांनाही त्यांनी सुरत किंवा अहमदाबादलाच न्यायला हवे होते. त्यांच्यासाठी तीच सुरक्षित शहरे आहेत,” असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला.
संजय राऊत यांनी पुढे सांगितले की, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असले तरी त्यांना आपल्याच नगरसेवकांची भीती वाटत आहे. शिंदे गटातील अनेक नगरसेवक हे कट्टर शिवसैनिक आहेत आणि त्यांच्या मनात अजूनही ‘मराठी मनाची मशाल’ धगधगत आहे. त्यांना कितीही कोंडले तरी आधुनिक दळणवळणाच्या साधनांमुळे त्यांच्याशी संपर्क साधणे कठीण नाही.
बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षात मुंबईचा महापौर भाजपचा व्हावा किंवा मुंबई भाजपला आंदण दिली जावी, असे कोणत्याही शिवसैनिकाला वाटणार नाही, असेही राऊत यांनी नमूद केले. “बहुमत हे चंचल असते आणि विचारांसाठी बंड करण्याचा अधिकार केवळ एकनाथ शिंदे यांनाच नाही,” असे सूचक विधान करत त्यांनी आगामी काळात मोठ्या राजकीय उलथापालथीचे संकेत दिले आहेत.




