मुंबई | Mumbai
राज्याची राजधानी असलेल्या मुंबई शहरात मागील काही दिवसांपासून संततधार पाऊस कोसळत आहे. सोमवार सकाळपासूनच मुंबई आणि उपनगरासाला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. गडगडाटासह मुंबई आणि उपनगरात पहाटेपासूनच पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे सकाळी ऑफिसला जाणाऱ्या चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली. मुंबईत सुरु असलेल्या पावसाने तर गेल्या अनेक वर्षांचा रेकॉर्डही मोडला आहे. मात्र, याच पावसाचा आज मुंबईतील मेट्रो -३ प्रकल्पाला चांगलाच फटका बसल्याचे पहायला मिळालाय.
मुंबईतील महत्त्वकांशी प्रकल्प एक्वा लाइन-३ ला पावसाचा फटका बसला आहे. मुंबईतील आचार्य अत्रे चौक वरळी मेट्रो स्थानकावर पावसाचे पाणी साचले आहे. मेट्रोमधून उतरताच प्रवाशांना तळ्यात उतरल्याचा भास होताना दिसला. काहीच दिवसांपूर्वी आरे ते आचार्य अत्रे चौक वरळी नाका या भुयारी मार्गावरील मेट्रो लाईन ३ वाहतूक सेवा सुरू करण्यात आली होती. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला होता. परंतु, पहिल्याच पावसात वरळीतील भुयारी रेल्वे स्थानकात पाणी शिरल्याचे पाहायला मिळाले. यामुळे भुयारी मेट्रो स्थानक आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
The newly thrown open Mumbai Metro 3! The much hyped underground Metro. The underground station platform is flooded, water can be seen leaking from the roof, water is flowing through the stairs. The Acharya Atre station has been closed, traffic suspended!
Does the Mahabrashth… pic.twitter.com/Tx7lowHaNT
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) May 26, 2025
दरम्यान, पाणी साचल्यानंतर मेट्रो सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भुयारी मेट्रोकडे जाणारे गेटही बंद करण्यात आला आहे. मुंबईतील अंडरग्राउंड मेट्रो-3 ही नुकतीच धावू लागली. मात्र मुंबईतील पहिल्याच पावसात भुयारी मेट्रोला याचा फटका बसला.
सरकारने कोट्यवधी रुपये खर्चून करण्यात आलेल्या मेट्रो प्रकल्पात पाणी शिरल्याने कामाच्या गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. भुयारी मेट्रोच्या माध्यमातून मुंबईकरांचा प्रवास सोईस्कर होईल, अशी अपेक्षा होती. मात्र पहिल्याच मोठ्या पावसात ही अपेक्षा फोल ठरली आहे.
मेट्रोचे दरवाजे उघडल्यावर स्थानकाचे पाणी मेट्रोतही शिरले. यानंतर बाहेर पडल्यानंतर स्वयंचलित जिने बंद होते. स्वयंचलित जिन्याच्या दोन पायऱ्या बुडतील, एवढे पाणी साचले होते. यानंतर स्थानकातील वरच्या मजल्यावर जाताना पायऱ्यांवरून अगदी धबधब्यासारखे पाणी स्थानकात जात होते. वरच्या मजल्यावर आल्यानंतर सगळीकडे चिखल साचला होता. वेफर्सची पाकिटे, बाटल्या असा सगळा कचरा त्या पाण्यासोबत स्थानकात आला होता, अशी माहिती मेट्रोतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी दिली.
कशी आहे मेट्रो-३ लाईन
‘ॲक्वा लाइन’ म्हणून ओळखली जाणारी ही भुयारी मेट्रो एकूण ३३ किमी लांबीची आहे. यातील धारावी ते आचार्य अत्रे चौक (वरळी नाका) हा ९.६९ किमी चा टप्पा काही दिवसांपूर्वीच सुरू झाला होता. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRCL) या मेट्रो मार्गाची उभारणी करत आहे. केंद्र आणि राज्य सरकार यामध्ये मदत करत आहेत. आरे जेव्हीएलआर ते बीकेसी असा पहिला टप्पा ७ ऑक्टोबर २०२४ ला सुरू झाला होता. हा १२.९९ किमी लांबीचा आहे. यात १० स्थानके आहेत.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा