Monday, July 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजMumbai News : कुर्ल्यात झाड कोसळून ६३ वर्षीय वृद्धाचा मृत्यू; BMC च्या...

Mumbai News : कुर्ल्यात झाड कोसळून ६३ वर्षीय वृद्धाचा मृत्यू; BMC च्या भोंगळ कारभाराचा आणखी एक बळी

मुंबई | Mumbai

मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि वेगवान वाऱ्यामुळे कुर्ला (पश्चिम) परिसरात एक अतिशय भीषण दुर्घटना घडली आहे. येथे झाड कोसळल्याने एका ६३ वर्षीय वृद्धाला आपला जीव गमवावा लागला आहे. चेंबूर येथे काही दिवसांपूर्वीच स्कूलबसवर झाड पडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, आता कुर्ल्यातील (Kurla) या दुर्घटनेमुळे मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) मान्सूनपूर्व झाड छाटणीच्या दाव्यांवर आणि तयारीवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, कुर्ला पश्चिम येथील कमानी परिसरातील बीएमसी शाळेजवळ (BMC School) असलेल्या ‘गोम्स गाऊन बिल्डिंग’ परिसरात आज (रविवारी) दुपारच्या सुमारास अचानक सुटलेल्या जोरदार वाऱ्यामुळे येथील एक मोठे झाड शेजारील दुकानावर उन्मळून पडले. झाड कोसळले तेव्हा युनूस कुंदावाला (वय ६३) हे दुकानातच हजर होते. झाडाचा प्रचंड ढिगारा दुकानावर पडल्याने ते त्यात गंभीररीत्या चिरडले गेले.

या घटनेची माहिती स्थानिक नगरसेवकांचे स्वीय सहाय्यक रोशन शिंदे यांनी तातडीने मुंबई महापालिकेच्या (BMC) आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाला दिली. दरम्यान, स्थानिक नागरिकांनी मोठ्या शर्थीने युनूस कुंदावाला यांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढले आणि तातडीने जवळच्या ‘फौझिया हॉस्पिटल’मध्ये दाखल केले. मात्र, दुर्दैवाने रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुंबई अग्निशामक दल (Fire Brigade) स्थानिक पोलीस, बेस्ट (BEST) कर्मचारी आणि पालिकेच्या वॉर्ड ऑफिसचे मदत पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी कटरच्या साहाय्याने दुकानावर पडलेले झाड कापून बाजूला केले. या दुर्घटनेमुळे परिसरातील वीजवाहिन्या तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता.

महापालिकेच्या कारभारावर संताप

मान्सूनपूर्वी झाडांच्या छाटणीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करूनही मुंबईत सातत्याने झाडे पडून निष्पाप नागरिकांचे बळी जात आहेत. चेंबूरनंतर आता कुर्ल्यातील घटनेमुळे पालिकेच्या ढिसाळ नियोजनाविरोधात नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्या

Nashik Cloudburst Update : नाशिककरांनो कामाशिवाय घराबाहेर पडू नका – महापौर...

0
नाशिक | Nashik भारतीय हवामान विभागाने जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि नाशिक तालुक्याच्या (Nashik Taluka) पश्चिम भागात मंगळवार (दि.०७ जुलै) रोजी ढगफुटी सदृश अतिवृष्टीची शक्यता वर्तवली...