Friday, November 13, 2026
Homeब्रेकिंग न्यूजMumbai Bomb Threat : मुंबईत पुन्हा बॉम्बस्फोटाची धमकी; महापौर कार्यालयासह विमानतळ, अमिताभ...

Mumbai Bomb Threat : मुंबईत पुन्हा बॉम्बस्फोटाची धमकी; महापौर कार्यालयासह विमानतळ, अमिताभ बच्चन यांचा बंगला अन् महत्त्वाची ठिकाणे टार्गेटवर

मुंबई | Mumbai

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत (Mumbai) पुन्हा एकदा बॉम्बस्फोट (Bomb Blast) घडवून आणण्याच्या धमकीचा ई-मेल आल्याने सुरक्षा यंत्रणांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. यापूर्वी केवळ मुंबई महापौर कार्यालय उडवून देण्याची धमकी दिली जात होती; मात्र आता थेट शहरातील सहा महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य करण्याचा इशारा देण्यात आला आहे. आज (गुरुवारी) सकाळी १० वाजून १२ मिनिटांनी हा धमकीचा ई-मेल प्राप्त झाला असून, यामध्ये ‘खलिस्तान बोलेगा, मुंबई जिंदाबाद’ असा मजकूर नमूद करण्यात आला आहे.

- Advertisement -

तिसऱ्यांदा आला धमकीचा ई-मेल

गेल्या काही दिवसांपासून अशा प्रकारचे धमकीचे ई-मेल (E-Mail) सातत्याने येत असून, ही तिसरी घटना आहे. यापूर्वी सुमारे दोन आठवड्यांपूर्वीही असाच ई-मेल पाठवण्यात आला होता. वारंवार मिळणाऱ्या या इशाऱ्यांमुळे मुंबई पोलीस (Mumbai Police) आणि सर्व सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आल्या आहेत.

बॉम्बशोधक पथकाची तपासणी आणि सद्यस्थिती

धमकीचा ई-मेल मिळताच मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील महापौर कार्यालय परिसरात सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडेकोट करण्यात आली. बॉम्बशोधक आणि नाशक पथकाने (BDDS) तातडीने घटनास्थळी धाव घेत संपूर्ण परिसराची कसून झाडाझडती घेतली. सुदैवाने, या तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन करत महापालिकेचे दैनंदिन कामकाज पूर्ववत सुरू ठेवण्यात आले आहे.

पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान

सातत्याने येणारे हे धमकीचे ई-मेल नेमके कोठून पाठवले जात आहेत, याचा शोध घेणे आता मुंबई पोलीस आणि सायबर सेलसमोर मोठे आव्हान ठरले आहे. या कृत्यामागे नेमका कोणाचा हात आहे आणि त्यांचा उद्देश काय आहे, याचा सखोल तपास यंत्रणांकडून सुरू करण्यात आला आहे.

या महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य करण्याची धमकी

  • – मुंबई महापौर कार्यालय (BMC)
    – छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ
    – ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचा बंगला
    – महालक्ष्मी रेसकोर्स
    – मुंबईतील प्रमुख बँका आणि न्यायालये

ताज्या बातम्या