मुंबई | Mumbai
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना काल पोलिसांनी ताब्यात घेतले होते. नितीन देशमुख यांना विधानभवनातून बाहेर घेऊन जात असताना जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला होता. सरकारी कामात अडथळा आणल्यामुळं जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात मुंबई पोलिसांनी मरिन ड्राइव्ह पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून आव्हाड विरूद्ध पडळकर असा वाद सुरू आहे. काल विधानभवनाच्या लॉबीमध्ये आव्हाडांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना पडळकरांच्या ५ कार्यकर्त्यांनी मारहाण केली. ही दृष्य कॅमेऱ्यात कैद झालीये. या प्रकरणानंतर दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची परवानगी घेऊन गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.
विधानभवनातील राड्या प्रकरणी नितीन देशमुख याला ताब्यात घेतल्यानंतर रात्री उशिरा पोलिसांकडून पुढील प्रक्रियेसाठी मरिन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला नेले जात होते. याचवेळी जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांच्या जीपसमोर झोपून त्याला विरोध केला होता. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी मरिन ड्राईव्ह स्टेशनला जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकीकडे विधानभवन परिसरात आव्हाडांच्या कार्यकर्त्याला मारहाण झाली. यानंतर रात्री उशिरा मारहाण झालेल्या कार्यकर्त्यालाच पोलिसांकडून अटक करण्यात आली आणि आता आव्हाडांविरोधात देखील गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे गोपीचंद पडळकर विरुद्ध जितेंद्र आव्हाड यांच्यातील वाद कुठेपर्यंत खेचला जाणार? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल होणे ही सत्तेची मस्ती – वडेट्टीवार
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल होणे ही सत्तेची मस्ती आहे, असे म्हटले. मकोकाचा आरोपी असणाऱ्याला विधानभवनात प्रवेश कसा मिळतो. सीसीटीव्हीत असे आले आहे की पडळकरांनी इशारा करुन नितीन देशमुखांना मारण्यास सांगितले असे विजय वडेट्टीवार म्हणाले. जितेंद्र आव्हाड यांच्यावर देखील हल्ला करायचा होता म्हणून गुंड विधानभनवाच्या आवारात आणले गेले होते, असा त्यांनी आरोप केला होता, आम्हाला पण तशा गोष्टी दिसतात. जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला असेल तर हे राज्य कायद्याचे राज्य राहिले नाही. सरकारच्या मर्जीनुसार चालणारे राज्य झालेय. जो सरकारच्या विरोधात आवाज उठवेल त्याच्यावर गुन्हा दाखल करु त्याला संपवून टाकू ही सत्तेची मस्ती आहे, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




