बिहार । Bihar
कंगना रनौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. तिच्या या वादग्रस्त वक्तव्यावरुन संपूर्ण देशातील वातावरण ढवळून निघाले होते. त्यानंतरही कंगनाने वादग्रस्त वक्तव्ये करणे सुरूचं ठेवलं आहे. त्यातच अभिनेत्री कंगना आणि तिची बहीण रंगोली यांना मुंबई पोलिसांनी समन्स बजावलं आहे. कंगना आणि तिची बहीण रंगोली यांना १० नोव्हेंबर रोजी हजर राहण्यास सांगितलं आहे.
कंगना रनौत आणि तिची बहीण रंगोली यांनी केलेल्या पोस्टमुळे हिंदू आणि मुस्लीम समाजात कलाकारांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप याचिकेतून करण्यात आला आहे. कंगनाविरोधात दोन व्यक्तींनी मुंबईतल्या वांद्रे कोर्टात याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्यांनी कोर्टात कंगनाचे काही ट्विट्स आणि तिच्या वक्तव्याचे व्हिडीओ सादर केले आहेत. कंगना आणि तिची बहीण यांच्याविरोधात ऑक्टोबर महिन्यातच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता वांद्रे कोर्टाने कंगना आणि तिच्या बहिणीला समन्स बजावले असून १० नोव्हेंबर रोजी कोर्टात हजर राहण्यास सांगितलं आहे.
गेल्या महिन्यात देशभरात कृषी कायद्यांच्या विरोधात वातावरण पेटले होते. कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी देशभरात आंदोलन केली. त्यानंतर कंगनाने यासंदर्भातही वादग्रस्त ट्विट केलं होतं. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबद्दल चुकीची माहिती आणि अफवा पसरवणारे तसेच, दंगल घडवणारेच हेच लोक आता कृषी विधेयकांवर चुकीची माहिती पसरवत आहेत. हे लोक देशात दहशतीचे वातावरण निर्माण करत आहेत, असं कंगनाने म्हटलं होतं. त्यानंतर वकील एल. रमेश नाईक यांनी यासंदर्भात कर्नाटकातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी न्यायाधीशांनी मुंबई पोलिसांना कंगनावर एफआयआर दाखल करुन चौकशी करण्याचे आदेश दिले होते. कंगनावर या प्रकरणी दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण करणे, जाणीवपूर्वक अपमान करणे, चिथावणी देणे आदी कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.