मुंबई | Mumbai
मुंबईत गेल्या २४ तासांपेक्षा जास्त काळ सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा जोर सध्या वाढला आहे. मुंबई उपनगरात काळोख दाटून आला असून पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. पावसाचा जोर वाढल्याने रस्त्यांवर आणि रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने मुंबईतील वाहतूक ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. शाळा, कॉलेजेसला सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहे. शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबईतील बहुतांश भाग जलमय झाला असून रस्ते पाण्याखाली गेले आहे. अशातच आता मुंबईकरांची चिंता वाढवणारी एक बातमी समोर आली आहे.
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर
मुंबईत संततधार सुरू झाल्यावर मिठी नदी दुथडी वाहू लागते. कुर्ला पुलावरील क्रांती नगर येथे मिठी नदी धोक्याच्या पातळीवर पोहोचली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून एनडीआरएफची टीम घटनास्थळी तैनात करण्यात आली आहे. क्रांतीनगर आणि संदेश नगरमधील १४० कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येणार असल्याच्या सूचना रहिवाशांना देण्यात आल्या आहेत. तर एनडीआरएफ आणि पालिकेची पथके क्रांतीनगर आणि संदेशनगर येथे दाखल झाली आहेत. १४० कुटुंबांना नजीकच्या मगनलाल नथूराम शाळेत स्थलांतरित करण्यात येत असल्याची माहिती पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. जवळपासच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सलग पाऊस असाच सुरू राहिल्यास मिठी नदी धोक्याची पातळी ओलांडू शकते. त्यामुळे परिसरात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
मिठी नदी सध्या 4.7 मीटरच्या पातळीवर पोहोचली आहे. आणखी काही तास पाऊस सुरु राहिल्यास मिठी नदीचे पाणी पात्राबाहेर येऊन माहीम, कुर्ला आणि साकीनाका या भागांमध्ये शिरु शकते. त्यामुळे पुढील काही तास मुंबईकरांच्यादृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहेत. सध्या दक्षिण मुंबईत पावसाचा जोर कमी झाला असला तरी उपनगरात अजूनही जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे मिठी नदीच्या पाण्याची पातळी सातत्याने वाढत आहे.
मुंबईला रेड अलर्ट
सोमवारी मुसळधार झालेल्या पावसानंतर मंगळवारीही मुंबईकरांची सकाळ पावसाळीच झाली आहे. सध्या मुंबईसह उपनगरांत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अलर्टनुसार, येत्या तीन ते चार तासांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबई उपनगरांत मागील २४ तासात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. विक्रोळी परिसरात सर्वाधिक 255.5 मिमी पाऊस झाला आहे. सोबतच, भायखळा, सांताक्रुज, जुहू, वांद्रे परिसरात देखील अतिवृष्टी झाल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




