मुंबई । Mumbai
राज्यात दहीहंडीचा जल्लोष सुरू असताना ठाण्यातील संस्कृती दहीहंडी महोत्सवाने यंदा नवा इतिहास घडवला आहे. जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाने तब्बल १० थरांचा मानवी मनोरा रचून विश्वविक्रमाची नोंद केली. पावसाचा जोरदार मारा असतानाही या पथकाचा उत्साह कमी झाला नाही आणि अखेर त्यांनी विक्रमी यश मिळवले.
ठाण्यातील परिवहन मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत हा थरार उलगडला. कोकण नगरच्या या कामगिरीनंतर मैदानावर एकच जल्लोष झाला. “मी आधीच पारितोषिकाची घोषणा केली होती. खऱ्या अर्थाने राष्ट्रभक्ती दाखवली आहे. मराठी एकीची ताकद तुम्ही सगळ्यांना दाखवून दिली. या पथकाला २५ लाखांचे बक्षीस देत आहे,” असे प्रताप सरनाईक यांनी जाहीर केले. त्यांनी पुढे सांगितले की, “विश्वविक्रम मोडण्यासाठीच असतो. याच मैदानावर यापूर्वीही विक्रम झाला होता आणि यंदाही झाला.”
जोगेश्वरी पथकातील विशाल कोचरेकर यांनी सांगितले की, “आम्हाला खात्री होती की यंदा १० थर रचू. २०२२ मध्ये आम्ही ९ थरांचा विक्रम केला होता. यंदा आमच्या पथकात ५५० गोविंदा सहभागी झाले. तब्बल दोन महिने सातत्याने सराव केला. प्रशिक्षक विवेक कोचरेकर यांनी नेहमीच ‘जखमी न होता थर रचा’ असे मार्गदर्शन केले.”
१० थर रचल्याच्या क्षणी वातावरण भारावून गेले. प्रताप सरनाईक यांचे सुपुत्र पूर्वेश सरनाईक भावूक झाल्याचे उपस्थितांनी सांगितले. या सोहळ्याला हजेरी लावलेल्या स्पॅनिश पाहुण्यांनीही गोविंदांच्या कौशल्यावर कौतुकाचा वर्षाव केला.
कोकण नगरनंतर आर्यन गोविंदा पथकाने नऊ थर रचत संस्कृती दहीहंडीत दमदार सलामी दिली. यंदा या सोहळ्यात ‘ऑपरेशन सिंदूर’ या सामाजिक जनजागृतीचा संदेश देण्यात आला. तसेच ‘शोले’ चित्रपटाला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल खास श्रद्धांजली वाहण्यात आली असून, त्याची प्रतिकृतीही येथे पाहायला मिळाली.
मुंबई, ठाणे आणि राज्यातील इतर ठिकाणी दहीहंडीचा उत्सव रंगात आला आहे. मुसळधार पावसातही गोविंदा पथकांचा उत्साह अबाधित राहिला असून, ठिकठिकाणी हंड्या फोडून उत्साहात जल्लोष साजरा केला जात आहे. ठाण्यातील हा विक्रम मात्र यंदाच्या दहीहंडी सोहळ्याचा सर्वात मोठा ठरला आहे.




