Saturday, July 27, 2024
Homeनगर‘अमृत’ व ‘फेज टू’ योजनेच्या प्रलंबित कामांत प्रगती होईना

‘अमृत’ व ‘फेज टू’ योजनेच्या प्रलंबित कामांत प्रगती होईना

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

‘अमृत’ व ‘फेज टू’ पाणी योजनेतील प्रलंबित कामे, शहरातील सर्व टाक्यांमध्ये पाणी भरून त्याव्दारे पाणी वितरणाचे नियोजन याबाबत 30 मे रोजी झालेल्या बैठकीनंतर 42 दिवसांत कुठलीही प्रगती झालेली नसल्याचे मंगळवारी (11 जुलै) झालेल्या बैठकीत समोर आले. तसेच, वसंत टेकडी येथे नव्याने बांधण्यात आलेल्या टाकीतून पाणी वितरणाचे नियोजनच प्रस्तावित नसल्याचेही बैठकीत स्पष्ट झाले.

- Advertisement -

महापौर रोहिणी शेंडगे व आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्या उपस्थितीत पाणी योजनेच्या कामाबाबत बैठक पार पडली. यावेळी स्थायी समिती सभापती गणेश कवडे, नगरसेवक शाम नळकांडे, शिवसेना (ठाकरे गट) शहरप्रमुख संभाजी कदम, माजी नगरसेवक निखिल वारे, जलअभियंता परिमल निकम, अभियंता गणेश गाडळकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता श्री. वारे, जय बिवाल, श्री. चौधरी आदींसह इतर कर्मचारी उपस्थित होते.

जलअभियंता निकम यांनी प्रलंबित कामांची माहिती दिली. वितरण व्यवस्थेचे नियोजन, पाणी उपसा, जलशुध्दीकरण केंद्रावरील कामाचे नियोजन अद्यापही केले नसल्याचे स्पष्ट करत आयुक्तांनी जाब विचारला. निर्मलनगर येथील टाकीमध्ये 12 तास पंप चालूनही पाणी पडत नाही, याकडे वारे यांनी लक्ष वेधले त्यावर बुधवारी सकाळी पुन्हा संजोग हॉटेल येथील वॉल सोडून चाचणी घेण्याचे ठरविण्यात आले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अभियंता उद्या ग्रामसभा असल्याची अडचण मांडली. त्यावर कदम यांनी अधिकार्‍यांना फैलावर घेत कारणे सांगू नका, कोट्यवधी रुपये खर्च केला असून नगरकरांना अद्यापही पाणी देता येत नाही, हे नियोजन तातडीने मार्गी लागले पाहिजे, अशी तंबी दिली.

त्यानंतर बुधवारी सकाळी चाचणी घेण्याचे ठरले. वसंत टेकडी येथे नव्याने बांधलेल्या 50 लाख लिटर क्षमतेच्या टाकीतून पाण्याचे वितरण करण्याबाबतचे नियोजन प्रस्तावित नसल्याचे समोर आले. अभियंता निकम यांनी डीपीआरमध्ये काय नियोजन आहे, याबाबत विचारणा केली. याबाबत तपासून नियोजन करू, असे मजीप्राच्या अभियंत्यांनी सांगितले. एकंदरितच प्रलंबित कामे, निधीच्या अडचणी व अधिकार्‍यांमध्ये समन्वय नसल्याने नगरकरांना दररोज मुबलक प्रमाणात पाणी मिळण्यासाठी प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या