अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
नागरिकांना महानगरपालिकेकडून अधिकाधिक चांगल्या दर्जाची सेवा व सुविधा देण्यासाठी सर्व विभागांनी प्रत्यक्ष कृती कार्यक्रम राबवावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या 100 दिवसांच्या कृती आराखड्याची तातडीने प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश सर्व विभागप्रमुखांना दिलेले आहेत. तसेच, नागरिकांना आवश्यक सेवा मोबाईलवर उपलब्ध करण्यासाठी व तक्रार निवारणीसाठी सद्यस्थितीत असलेले महानगरपालिकेच्या अॅप मध्ये नव्याने काही फीचर्स समाविष्ट करणार आहे तसेच त्याला व्हॉट्सअॅप चॅनलव्दारे जोडण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली.
आयुक्त डांगे यांनी सर्व विभागांच्या कामकाजाचा आढावा घेत सर्वप्रथम कार्यालयांच्या स्वच्छतेवर भर देण्याचे आदेश दिले. कार्यालयामधील कर्मचारी व त्याठिकाणी येणारे अभ्यागत यांच्याकरिता पिण्याच्या स्वच्छ व शुध्द पाण्याची योग्य व कायमस्वरूपी व्यवस्था करणे, कर्मचारी व अभ्यागत यांना स्वच्छ व नीटनेटकी प्रसाधनगृहे उपलब्ध करून देणे, अभ्यागतांसाठी प्रतिक्षालय करणे, सुव्यवस्थित नामफलक व दिशादर्शक फलक लावणे आदी सूचना त्यांनी दिल्या.
महानगरपालिकेचे संकेतस्थळ माहितीने परिपूर्ण व अद्ययावत व नागरिकांना वापरण्यास सुलभ असावे. नागरिकांना आवश्यक असलेल्या सेवा ऑनलाईन उपलब्ध करून द्याव्यात.
माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील तरतुदींनुसार जास्तीत जास्त माहितीचे स्वयंप्रकटीकरण करण्यात यावे. तसेच लोकसेवा हक्क अधिनियम 2015 मधील तरतुदींनुसार महानगरपालिका पुरवत असलेल्या सर्व सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देता येतील, यादृष्टीने उपाययोजना कराव्यात. त्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी व महापालिकेच्या मोबाईल अॅप मध्ये नव्याने काही फीचर्स तयार करण्यात येणार आहेत, असे आयुक्तांनी यावेळी सांगितले.
अभ्यागतांना भेटण्यासाठी दुपारी दोन ते पाचची वेळ
नागरिकांशी नियमित संपर्क राखण्याच्या दृष्टीने सर्व अधिकार्यांनी कार्यालयात अभ्यागतांच्या भेटीसाठी ठराविक दिवशी दुपारी 2 ते 5 हा वेळ राखून ठेवावा व तसा फलक कार्यालयात दर्शनी भागात प्रदर्शित करावा. त्याचप्रमाणे यावेळी दौर्यावर असल्यास भेट देण्यासाठी अन्य अधिकार्याची नेमणूक करावी. कार्यालयात नागरिकांना भेटण्याप्रमाणेच विभागप्रमुख अधिकार्यांनी आठवड्यातील किमान 2 दिवस आपल्या अधिनस्त कार्यालयांना भेटी देऊन पाहणी करावी, अशा सूचना आयुक्त डांगे यांनी दिल्या.