अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
नऊ दिवसांपासून सातवा वेतन आयोगाच्या प्रमुख मागणीसाठी महापालिका कर्मचार्यांनी उपोषण सुरू केले होते. मनपा कर्मचार्यांच्या प्रश्नाची आ. संग्राम जगताप यांनी दखल घेत कर्मचार्यांच्या सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुंंंबईत ठाण मांडले. मंगळवारी उशिरा याबाबतच प्रस्तावावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्वाक्षरी झाली असल्याची माहिती आ. जगताप यांनी दिली. यावेळी त्यांच्याहस्ते उपोषणकर्त्यांनी लिंबू पाणी घेऊन उपोषण सोडले.
आठ वर्षांपासून महापालिका कर्मचार्यांनी सातवा वेतन आयोग मिळावा यासाठी लढा उभारला आहे. त्यासाठी अनेकवेळा शासनाला पत्र व्यवहार केला, निवेदने दिली. दरम्यान महापालिका कर्मचार्यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी 2023 मध्ये कर्मचार्यांनी लाँग मार्चही काढला होता. परंतु, त्यानंतर सरकार दरबारी बैठका होऊनही प्रश्न मार्गी न लागल्याने कर्मचारी बाबासाहेब मुदगल, जितेंद्र सारसर, बाबासाहेब राशीनकर यांनी उपोषण सुरू केले होते. उपोषणाला महापालिका स्वच्छता कर्मचार्यांनी कामकाज बंद ठेवून पाठिंबा दिला होता. तर दुसरीकडे उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत चालली होती. लाईट, पाणी, स्वच्छता, साफसफाई बंद ठेवण्याचा इशारा कर्मचार्यांनी दिला होता.
या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेत आ. जगताप यांनी मुंबईत ठाण मांडले. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून महापालिका कर्मचार्यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा केला. मंगळवारी उशिरा मनपा कर्मचार्यांच्या सातवा वेतन आयोगाच्या प्रस्तावावर स्वाक्षरी झाली असल्याची माहिती आ. जगताप यांनी दिली. तसेच उपोषणकर्त्यांची भेट घेत सविस्तर माहिती दिल्यानंतर उपोषणकर्त्यांनी आ. जगताप यांच्याहस्ते उपोषण सोडले.
चार हजार कर्मचार्यांना फायदा
राज्यातील इतर महापालिका कर्मचार्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. परंतु, नगर महापालिकेचे उत्पन्न कमी असल्याचे कारण सांगत कर्मचार्यांना सातवा वेतन आयोग लागू केला जात नव्हता. अखेर आ. जगताप यांनी महापालिका कर्मचार्यांच्या प्रश्नामध्ये गांभीर्याने लक्ष घातल्याने सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लागला आहे. आ.जगताप यांच्या पाठपुराव्यामुळे 1600 कायमस्वरूपी व 2500 सेवानिवृत्त अशा एकूण चार हजार कर्मचार्यांचा फायदा होणार आहे.