अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
एकीकडे महापालिकेच्या मुख्यालयापासून चारही प्रभाग कार्यालयांमध्ये व दोन उपकार्यालयांमध्ये शुकशुकाट व दुसरीकडे शहरभर रस्त्याच्या कडेला पडलेले कचर्याचे ढीग, असे चित्र मंगळवारी नगरमध्ये होते. कर्मचार्यांच्या लाँग मार्चचा फटका नगरकरांना अस्वच्छतेच्या माध्यमातून बसला आहे. दरम्यान, मनपामध्ये प्रोबेशनवर असलेल्या 77 सफाई कामगारांना व अन्य विविध विभागांत असलेल्या 20 जणांना शिस्तभंगाच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
सातवा वेतन आयोग व वारसा हक्काने नोकरी या मागण्यांसाठी मनपा कामगार संघटनेने नगर ते मुंबई लाँग मार्च काल गांधी जयंतीला सुरू केला आहे. मंगळवारी दुसर्या दिवशी हा मोर्चा पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे मुक्कामी होता. तर इकडे मनपाच्या मुख्यालयासह सावेडी, नगर शहर, झेंडीगेट-मुकुंदनगर व बुरूडगाव-केडगाव ही चार शहर कार्यालये तसेच केडगाव व नागापूर उपकार्यालये कर्मचारी नसल्याने ओस पडली आहेत. कार्यालयांतून रिकाम्या खुर्च्या आहेत. मंगळवारी मनपात लोकशाही दिन असल्याने अधिकारी त्यात होते. त्यामुळे मनपात किती कर्मचारी हजर आहेत व किती गैरहजर आहेत, याची माहिती घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
मात्र, वरिष्ठ अधिकारी तसेच प्रभाग अधिकारी, काही विभाग प्रमुख यांच्यासह पाणीपुरवठा, अग्निशामक व आरोग्य या अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता 70 टक्क्यांवर कर्मचारी गैरहजर असल्याचे सांगण्यात आले. सफाई कर्मचारीही लाँग मार्चला गेल्याने मंगळवारी शहरात झाडलोट झाली नाही. घंटागाड्यांनी कॉलन्यांतून जाऊन कचरा संकलन केले. पण सार्वजनिक रस्ते घाणीने माखले होते व त्याची दुर्गंधी पसरली होती. मनपाचे 30 ते 40 कर्मचारी लाँग मार्च सोडून कामावर आले होते व त्यांच्यासह खासगी 70 ते 80 जणांनी मिळून काही भागात स्वच्छता केली. मनपा कामगार-कर्मचार्यांच्या लाँग मार्चला राज्यातील सत्ताधारी महायुतीच्या काहींचे प्रोत्साहन असल्याची शहरात चर्चा आहे. सातवा वेतन आयोग व वारसा हक्काने नोकरीचा विषय राज्याचे मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून मार्गी लावणे गरजेचे असताना नगरमध्ये मात्र काही मुख्यमंत्री शिंदे समर्थकांनी लाँग मार्चला निघालेल्यांना शुभेच्छा दिल्याचे सांगितले जाते.
दरम्यान, कामगार संघटनेेचा लाँग मार्च होऊ नये म्हणून बैठक घेताना मागण्यांबाबत मंत्रालय स्तरावर बैठक घेण्याची ग्वाही आ. संग्राम जगताप यांनी दिली होती. त्याअनुषंगाने त्यांनी कालच मुंबईला जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सामाजिक न्यायमंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. लवकरच ही बैठक होण्याची शक्यता आहे.
915 कर्मचारी गैरहजर
मंगळवारी दुसर्या दिवशी सुमारे चारशे ते पाचशे कर्मचारी लाँगमार्चमध्ये सहभागी असल्याचे दिसून आले. तर सुमारे पाचशेहून अधिक कर्मचारी ‘लाँगमार्च’मध्ये नाही अन् कामावरही नाहीत, असे चित्र होते. महापालिकेकडे उपलब्ध आकडेवारीनुसार 1561 पैकी 646 कर्मचारी कामावर हजर होते. 915 कर्मचारी गैरहजर होते. शेकडो कर्मचार्यांनी लाँगमार्चचे निमित्त साधून कार्यालयाकडे पाठ फिरवली. त्यामुळे महापालिकेचे प्रशासकीय कामकाज ठप्प झाले.
गुन्हे दाखल करण्याचा इशारा
खासगी संस्थेमार्फत सुरू असलेले कचरा संकलन रोखण्याचा प्रयत्न पाच ते सहा ठिकाणी झाला. सर्जेपुरा परिसरात कचरा वाहून नेणार्या गाडी चालकास शिवीगाळ व दमदाटी करून कचरा खाली करण्यास भाग पाडले. मनपाचे सहाय्यक स्वच्छता निरीक्षक भरतसींग सारवान यांनी तोफखाना पोलिसांत फिर्याद दिली आहे. दरम्यान, कचरा संकलन कामात अडथळा आणल्यास मी स्वतः गुन्हे दाखल करेल, असा इशारा आयुक्त जावळे यांनी दिला आहे.