नाशिक | प्रतिनिधी Nashik
पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला असताना, नाशिक महापालिकेने जुने नाशिक परिसरासह शहरातील इतर काही भागातील धोकादायक इमारती, जुने वाडे व घरांना नोटासा देण्यास सुरूवात केल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान अत्यंत धोकादायक झालेल्या काझीगढीचा प्रश्न यंदाही गाजणार असल्याची चिन्हे आहे. कारण मनपाकडून त्यासाठी काही ठोस नियोजन करण्यात आल्याचे दिसत नाही. दर वर्षी पावसाळ्यात शहरातील जुन्या इमारतींना तडे जातात, काही ठिकाणी घरांच्या भिंती कोसळण्याच्या घटना घडतात. त्यामुळे दुर्घटनांपासून बचाव करण्यासाठी महापालिकेने आतापासूनच तयारी सुरु केली असून, धोकादायक घरांची यादी तयार करून संबंधितांना नोटिसा पाठवल्या जात आहेत.
गंगा घाट परिसरात हजारो भाविकांची ये-जा असते. त्यामुळे घाटाजवळील धोकादायक वाड्यांची स्थिती गंभीर बनत आहे. महापालिकेच्या नोटिसा ही सुरुवात असली तरी या ठिकाणी तत्काळ योग्य उपाययोजना न झाल्यास संभाव्य अपघात टाळणे कठीण जाईल, असे नागरिकांचे म्हणणे आहे. दुसरीकडे, काझीगढीची समस्या अद्याप कायम ती गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांनी वारंवार निवेदने दिली असली तरी अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. त्याामुळे या पार्श्वभूमीवर केवळ नोटिसा देणे पुरेसे नसून, शहराच्या विविध भागांतील दीर्घकालीन समस्यांवर महापालिकेने स्पष्ट भूमिका घ्यावी आणि तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी जोर धरत आहे.