अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
सावेडी उपनगर परिसरात दफनभूमीसाठी 32 कोटी रुपये खर्चून नव्याने जागा खरेदी करण्याचा महापालिकेच्या सर्वसाधारण सभेचा ठराव वादग्रस्त ठरला आहे. या मुद्द्यावरून काँग्रेसने आक्रमक होत भाजप-राष्ट्रवादीला टार्गेट केले आहे. तर दुसरीकडे बाळासाहेबांची शिवसेनाच्या नगरसेवकांनी या विषयाला हरकत घेत सत्ताधारी शिवसेनेला अडचणीत आणले आहे. या ठरावाला 9 नगरसेवकांनी विरोध दर्शवला होता. आता आणखी तिघांनी या विषयाला विरोध करत ठरावाची अंमलबजावणी न करण्याची मागणी आयुक्तांकडे केली आहे.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे बाळासाहेब बोराटे, अमोल येवले, बाळासाहेबांची शिवसेनाचे अनिल शिंदे, मदन आढाव, संग्राम शेळके, काँग्रेसच्या शीला चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसच्या परवीन कुरेशी, समद खान, बसपाचे अक्षय उनवणे या नगरसेवकांनी लेखी पत्र देऊन 32 कोटींच्या भूसंपादनाला विरोध दर्शवला आहे. आता आसिफ सुलतान, नज्जू पहिलवान, प्रदीप परदेशी या तिघा नगरसेवकांनी विरोधाची पत्रे महापालिका प्रशासनाला सादर केली आहेत. आत्तापर्यंत 12 नगरसेवकांनी विरोध दर्शवला आहे.
तसेच बाळासाहेबांची शिवसेनाचे जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले, शहर काँग्रेसनेही महापालिका आयुक्तांना पत्र देऊन 32 कोटींच्या भूसंपादनाला हरकत घेत न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. जागरूक नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहास मुळे यांनी या ठरावा विरोधात शासनाकडे याचिका दाखल केली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते अभय आगरकर यांनीही 32 कोटींचा खर्च न करता स्वमालकीची पर्यायी जागा देण्याचा सल्ला दिला आहे. गेल्या तीन दिवसांपासून या जागेच्या भूसंपादनावरून महापालिकेत विरोधाची निवेदने दिली जात आहेत.
काँग्रेसकडून करण्यात आलेल्या ‘32 खोके.. एकद ओके’ च्या आरोपानंतर संपूर्ण शहरात या विषयाची मोठी चर्चा रंगली आहे. महापालिका आयुक्तांनी या ठरावाची अंमलबजावणी न करता तो ठराव शासनाकडे विखंडित करण्यासाठी पाठवावा, यासाठी दबाव वाढत आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त याबाबत काय निर्णय घेतात, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.