नाशिक । प्रतिनिधी Nashik
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील मोडकळीस आलेल्या धोकादायक घरांना मनपाच्या वतीने नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.
मनपातर्फे नाशिकरोड, सातपूर, पंचवटी, नवीन नाशिक, नाशिक पूर्व व नाशिक पश्चिम विभागातील धोकेदायक घरे, इमारतींची पाहणी करून त्यांचे मालक आणि भाडेकरू यांना घरे खाली करणे, उतरवून घेण्याबाबत रीतसर नोटिसा बजावल्या आहेत. नोटिसा दिलेल्या काही घरमालकांनी मोडकळीस आलेल्या घरांची स्वतःहून दुरुस्ती, उतरवणे आदी कामे हाती घेतली आहेत.
काही घरांना गेल्या काही वर्षांपासून कुलूप आहे तर काही घरांतील भाडेकरू सुरक्षित ठिकाणी वास्तव्याला गेले असल्याची माहिती समोर आली आहे. पालिकेच्या नोटिसीला ज्या धोकादायक घरांचे मालक, भाडेकरू सहकार्य करण्यास टाळाटाळ करतील अशा घरमालक, भाडेकरूंवर रितसर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती आयुक्त मनीषा खत्री यांनी दिली.
पालिकेच्या विभागीय कार्यालयांकडून धोकेदायक घरे, इमारतींच्या मालकांना दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर नोटिसा दिल्या जातात. परंतु या नोटिसींना घरमालक, भाडेकरू अजिबात जुमानत नसल्याचे वास्तव आहे. गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ काही जुन्या इमारतींना पालिकेकडून नोटिसा दिलेल्या आहेत.