Saturday, July 27, 2024
Homeनगरशासनाला परत गेलेल्या चार कोटींची जबाबदारी निश्चित करा

शासनाला परत गेलेल्या चार कोटींची जबाबदारी निश्चित करा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

स्वच्छता अभियानात सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारण्यासाठी मनपाला आलेले 3 कोटी 85 लाख रुपये वर्षभर तसेच पडून होते व नंतर ते शासनाला परत गेल्याने यास जबाबदार कोण, असा सवाल स्थायी समितीचे सभापती गणेश कवडे यांनी मंगळवारी केला. यासंदर्भात तातडीने जबाबदारी निश्चित करून दोषींवर केलेल्या कारवाईचा अहवाल स्थायी समितीस सादर करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

- Advertisement -

मनपा स्थायी समितीच्या सभेत स्वच्छता अभियानासाठी आलेले पैसे शासनाला परत पाठवले गेल्याच्या विषयावर नगरसेवक आक्रमक झाले. त्यांनी मनपा प्रशासनाला धारेवर धरले. सभापती कवडे यांच्यासह नगरसेवक विनीत पाऊलबुद्धे, नगरसेविका मंगल लोखंडे, पल्लवी जाधव यांनी प्रशासनाला धारेवर धरले. शहरास स्वच्छता अभियानाची बक्षिसे मिळाली असताना तसेच शहरात सार्वजनिक स्वच्छतागृहांची गरज असताना या कामासाठी शासनाकडून आलेले पैसे वर्षभर तसेच पडून ठेवले व त्यातून शहरात स्वच्छतागृहे न उभारता शासनास पैसे परत करणे नामुष्कीचे आहे. त्यामुळे यात दोषी असलेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांवर जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर केलेल्या कारवाईचा अहवाल 8 दिवसांत स्थायी समितीला सादर करण्याचे आदेश सभापती कवडे यांनी दिले.

महापालिकेत कामे विलंबाने होतात तसेच छाननी समितीची गरजच काय, अशा विविध मुद्यांवर खा. डॉ. सुजय विखे यांनी मध्यंतरी केडगाव, सावेडी व शहरातील जाहीर कार्यक्रमांतून नाराजी व्यक्त केली होती. त्याचे पडसाद स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. कवडेंसह पाऊलबुद्धे व जाधव यांनी नाराजी व्यक्त करताना मनपात छाननी समितीची गरज आहे काय, दोन-दोन महिने विकास कामांच्या फाईल्स पुढे सरकत नाहीत, निष्कारण त्रुटी काढल्या जातात, असे दावे केले. अतिरिक्त आयुक्त डॉ.प्रदीप पठारे यांनी दर आठवड्यात दोन दिवस छाननी समितीच्या बैठका होत असून, कोणत्याही कामाला विलंब होत नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, खासदारांच्या नाराजीची दखल मनपा प्रशासनाने घ्यावी व विकास कामांच्या फाईल्स तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना सभापती कवडेंनी दिल्या. दरम्यान, सावेडीतील टीव्ही सेंटर ते भिस्तबाग रस्त्याच्या दुरवस्थेबद्दलही नाराजी व्यक्त झाली. अवघ्या सहा महिन्यांत हा रस्ता उखडल्याची तक्रार पाऊलबुद्धे यांनी केली.

तेव्हा मर्यादा पाळणार नाही

आता पदावर असल्याने आम्हाला मर्यादा येत आहेत. पण कार्यकाळ संपला की आम्ही मर्यादा पाळणार नाही, त्यावेळी मनपा प्रशासनाविरुद्ध अधिक आक्रमक होऊ, असा सूचक इशारा सभापती कवडे यांनी यावेळी दिला. पाच हजार झाडे लावण्याच्या मोहिमेत ठेकेदार 600 झाडे लावल्याचे सांगतो, पण हिशेब मात्र त्याने अवघ्या 26 झाडांचाच दिल्याचे उद्यान विभाग प्रमुख शशिकांत नजान यांनी सांगताच सदस्यांनी डोक्याला हात लावला, पण त्यावर भाष्य मात्र काहीच केले नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या