अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
शहरातील सर्व मालमत्तांच्या नोंदी अद्ययावत करून कर आकारणीसाठी त्यांचे पुनर्मुल्यांकन करण्याची मोहीम महापालिकेच्या वसुली कर्मचार्यांकडून सुरू आहे. वसुली लिपिकांमार्फत इमारती, घरे व गाळ्यांच्या बांधकामांची तपासणी केली जात आहे. आत्तापर्यंत झालेल्या तपासणीत कर आकारणी होत नसलेल्या दोन हजार 270 मालमत्ता आढळून आल्या आहेत. यात निवासी व अनिवासी मालमत्तांचा समावेश आहे.
मालमत्ता कर आकारणी व वसुली विभागाकडून तयार करण्यात आलेल्या वॉर्डनुसार वसुली लिपिकांकडून कर वसुली होत आहे. यापूर्वी सन 2003-2004 या आर्थिक वर्षात वाढीव हद्दीसह संपूर्ण क्षेत्रातील इमारती, मोकळ्या जागांचे मालमत्ता कर आकारणी करण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले होते. महापालिका अस्तित्वात आल्यावर झोन निश्चित करून महासभेच्या मंजुरीने सर्वेक्षण झाले. सन 2005-2006 या आर्थिक वर्षात मूल्यांकन निश्चिती होऊन मालमत्ता कर आकारणी करण्यात आली आहे.
त्यानंतर नव्याने अस्तित्वात आलेल्या, वाढीव बांधकाम केलेल्या, भाडेकरी असलेल्या अथवा कुठल्याही प्रकारचा वापरात बदल झालेल्या इमारती व मोकळ्या जागांच्या नोंदी आजतागायत वसुली लिपिकांकडून अद्ययावत झालेल्या नाहीत. त्यामुळे जुन्या नोंदीनुसार कराची आकारणी सुरू आहे. परिणामी, महापालिकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याने आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्या आदेशानुसार वसुली लिपिकांमार्फत पुनर्मुल्यांकन मोहीम सुरू करण्यात आली आहे.
1 जुलैपासून सुरू झालेल्या या मोहिमेतील तपासणीत आत्तापर्यंत शहरातील दोन हजार 270 मालमत्तांना कर आकारणी होत नसल्याचे समोर आले. त्यांची मोजमापे घेऊन रेटेबल व्हॅल्यू निश्चित करण्यात आली आहे. या मालमत्तांना आता महापालिकेकडून कर आकारणी सुरू होणार आहे. दरम्यान, बहुतांशी वसुली लिपिकांची बीएलओ म्हणून नियुक्ती आहे. सध्या मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम सुरू असल्याने तपासणी मोहिमेला काहीसा ब्रेक लागला आहे. मोहिमेला गती देण्यासाठी वसुली कर्मचार्यांसमवेत इतर कर्मचार्यांवरही जबाबदारी सोपवण्याची गरज आहे.
महापालिकेच्या कर्मचार्यांनी केलेल्या तपासणीत व पुनर्मुल्यांकन सर्वेक्षणात आढळून आलेल्या दोन हजार 270 मालमत्तांची मोजमापे घेण्यात आली आहेत. मालमत्ता असलेल्या क्षेत्रात यापूर्वी मंजूर असलेल्या दरानुसार त्यांची एक कोटी 33 लाख 69 हजार 46 एवढी रेटेबल व्हॅल्यू निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार या मालमत्तांना होणार्या कर आकारणीमधून महापालिकेच्या उत्पन्नात सुमारे 55 लाख रुपयांनी वाढ होणार आहे.