Monday, June 24, 2024
Homeनगरनगरमध्ये मंदिर-मदरशावर हातोडा

नगरमध्ये मंदिर-मदरशावर हातोडा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

नगर शहरात महापालिका व पोलिसांनी मंगळवारी भल्या सकाळी विशेष मोहीम राबवत अनधिकृत बांधलेले मंदिर व मदरसा अतिक्रमणे उदध्वस्त केली. काटवन खंडोबा रस्त्यावरील मनपाच्या संजयनगर घरकुल संकुल (वसाहत) परिसरातील खुल्या जागेत ही बांधकामे करण्यात आली होती. जेसीबीद्वारे या बांधकामांसह अतिक्रमण असलेली पिठाची गिरणी, शव पेट्या तयार करणारे दुकान तसेच अन्य अनधिकृत शेडही काढून टाकण्यात आले. मनपाची ही कारवाई पाहण्यास तेथे गर्दी झाली होती, पण कोणीही तिला विरोध केला नाही. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत मनपा-पोलिसांची ही कारवाई झाली.

शिर्डीच्या जागेवरून उद्धव ठाकरेंसमोर पेच

नवीन टिळक रोड ते अमरधाम रस्त्यावर आयुर्वेद कॉर्नरपासून काटवन खंडोबा मंदिराकडे जाणारा रस्ता आहे. हा रस्ता पुढे स्टेशन रस्त्यावरील आगरकर मळ्याकडे जातो. या रस्त्यावर काटवन खंडोबा मंदिराजवळ असलेल्या मनपाच्या संजयनगर घरकुल योजनेच्या मोकळ्या जागांमध्ये कोणीतरी मंदिर उभारले होते व तेथे जवळच पत्र्याच्या शेडमध्ये मदरसाही होता. याशिवाय पिठाची गिरणी, शवपेट्या तयार करण्याचा कारखाना व अन्य काही शेडही होते. या अतिक्रमणांचा त्रास परिसरातील रहिवाशांना होत होता. मात्र, मंदिर व मदरसा अतिक्रमणांचा मुद्दा संवेदनशील असल्याने याबाबत कोणी बोलत नव्हते. या पार्श्वभूमीवर मनपा व कोतवाली पोलिसांनी मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास फौजफाट्यासह धाव घेतली व सूर्योदय होताच सकाळी सव्वा सहाच्या सुमारास तोडातोडीची कारवाई सुरू केली. सुमारे दोन तासांच्या या कारवाईत येथील मंदिर, मदरसा व अन्य अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली. चार-पाच वर्षांपूर्वी मनपाने रस्त्याच्या वाहतुकीला अडथळा ठरणारी धार्मिक स्थळे हटवण्याची मोहीम कठोरपणे राबवली होती. त्यानंतर पुन्हा एकदा मनपाने अवैध धार्मिक स्थळांवर हातोडा घातला आहे.

शेतकर्‍यांकडील चारा खरेदीचे लवकरच धोरण

सात महिन्यांपूर्वी तक्रार

मनपाच्या संजयनगर घरकुल योजनेच्या मोकळ्या जागांचा दुरुपयोग सुरू असून, येथे मंदिर उभारल्याने तसेच मदरसा सुरू केल्याने जातीय व सामाजिक तणाव निर्माण होऊ शकतो व या धार्मिक स्थळांसह अन्यही अवैध बांधकामे येथे होत असल्याने त्याचा परिसरातील रहिवाशांना त्रास होत असल्याची तक्रार मनपाकडे करण्यात आली होती. या तक्रारीची चौकशी सुरू झाल्यावर मनपाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने पाहणीही केली होती. पण प्रत्यक्ष कारवाईला मुहूर्त मिळत नव्हता. त्यामुळे 15 दिवसांपूर्वी पुन्हा मनपाकडे काहींनी तक्रारी केल्यावर आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्या आदेशाने अतिक्रमणे हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. मनपाच्या पथकाने दोन-तीन दिवसांपासून या परिसरात येऊन तेथील रहिवाशांना येथील अतिक्रमणे स्वतःहून काढून घेण्याच्या सूचना दिल्या गेल्या होत्या. सोमवारी रात्रीही मनपा पथकाने या अतिक्रमणांची पाहणी करून दोन-तीन दिवसात ती काढण्याची कारवाई करण्याचे सूचित केले होते. मात्र, अचानकपणे मंगळवारी भल्या पहाटेच तेथे पथक पोहोचले व सकाळीच ही अतिक्रमण हटाव कारवाई तडीस नेण्यात आली. जेसीबी, हातोडे व अन्य साहित्याने ही अतिक्रमणे तोडली गेली. मंदिरातील मूर्ती सुरक्षितपणे काढल्यावर ती परिसरातील भाविकांकडे देण्यात आली व त्यानंतर या मूर्तीखालील फरशांचा चौथरा तोडण्यात आला तसेच याच भागात असलेला पत्र्याच्या शेडमधील मदरसाही तोडला गेला. ही दोन अवैध बांधकामे काढल्यावर अन्य अतिक्रमणेही काढली गेली. मनपाचे अतिक्रमणविरोधी पथकाचे प्रमुख आदित्य बल्लाळ यांच्यासह नगर शहर प्रभाग अधिकारी राकेश कोतकर, क्षेत्रीय अधिकारी रिजवान शेख व नितीन इंगळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. यावेळी कोतवालीचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वाखाली पोलिस व राखीव दलाचा फौजफाटा बंदोबस्तासाठी उपस्थित होता.

राज्य सरकार म्हणून के. के. रेंजच्या विस्तारास विरोध

कोणाचाही फोेन नाही…विरोध नाही

संजयनगर परिसरात मनपाने सहा-सात वर्षांपूर्वी तीनशेवर घरकुले उभारली आहेत. नगर शहरातील कोठी, बालिकाश्रम रस्ता, रामवाडी व अन्य परिसरात रस्ते रुंदीकरणादरम्यान ज्यांची घरे बाधीत झाली, त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी मनपाने ही घरकुले उभारली आहेत. येथे सर्वधर्मिय रहिवासी गुण्यागोविंदाने राहात आहेत. या परिसरात पाणीपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता व अन्य नागरी सुविधांची वानवा आहे व त्यावरून परिसरातील रहिवासी एकत्रितपणे मनपाकडे नेहमी पाठपुरावा करतात. या वसाहतीतील मोकळ्या जागा (ओपन स्पेस) मुलांना खेळण्यासाठी उपयोगी होत होत्या. पण काहींनी तेथे मंदिर व मदरसा उभारला, त्यानंतर अन्य अतिक्रमणेही झाली. त्याबाबत तक्रार झाल्याने मनपाने विशेष मोहीम राबवून ती मंगळवारी सकाळी जमीनदोस्त केली. पण या कारवाईदरम्यान कोणाचाही विरोध झाला नाही वा काही अनुचित प्रकारही घडला नाही. विशेष म्हणजे कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याने या कारवाईबाबत साधी विचारणा करणारा वा विरोध करणारा फोनही मनपाच्या अधिकार्‍यांना वा पोलिस अधिकार्‍यांना केला नाही.

छिंदम बंधूंसह चौघांचा गुन्ह्यातून वगळण्याचा अर्ज नामंजूर

- Advertisment -

ताज्या बातम्या