Sunday, January 18, 2026
HomeनगरAhilyanagar : मनपा निवडणूक निकालानंतर नालेगावात झोंबाझोंबी

Ahilyanagar : मनपा निवडणूक निकालानंतर नालेगावात झोंबाझोंबी

नवनिर्वाचित नगरसेवकासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

नालेगाव परिसरातील लांडे गल्लीत शुक्रवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास आपसात झोंबाझोंबी करणार्‍या चारजणांविरुद्ध कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यात नवनिर्वाचित नगरसेवकाचा समावेश आहे. शांततेचा भंग केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

- Advertisement -

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, शुक्रवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास नालेगाव येथील लांडे गल्लीत काही तरुण आपसात भांडण करत असल्याची माहिती कोतवाली पोलीस ठाण्यात मिळाली होती. या माहितीवरून गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्या ठिकाणी चारजण एकमेकांच्या अंगावर धावून जात झोंबाझोंबी करत असल्याचे पोलिसांना दिसून आले.

YouTube video player

पोलिसांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र ते कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर पोलिसांनी या चौघांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. यामध्ये नगरसेवक गणेश कवडे, मयूर मनोहर पवार, स्वप्नील भाऊसाहेब काळे आणि उमेश कवडे (सर्व रा. नालेगाव, अहिल्यानगर) यांचा समावेश आहे. या प्रकरणी पोलीस अंमलदार सूरज कदम यांनी फिर्याद दिली आहे.

महिलेला जीवे मारण्याची धमकी
दरम्यान, यासंदर्भात कोतवाली पोलीस ठाण्यात एका महिलेने तक्रार दिली असून यावरून गणेश कवडे व अनिरुद्ध कवडे यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नालेगाव, लांडे गल्ली परिसरात राहणार्‍या गायत्री पवार (वय 29) यांनी ही तक्रार दिली आहे. संशयितांनी तक्रारदार महिलेला व त्यांच्या नातेवाईकांना शिवीगाळ करत दमदाटी केली. तसेच मारहाण करत तुला काय करायचे ते करून घे, तुम्हाला गोळ्या घालून मारून टाकू अशी जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

ताज्या बातम्या