नाशिक । प्रतिनिधी Nashik
येत्या शुक्रवार अर्थात सात फेब्रुवारीपासून तीन दिवसांसाठी महापालिका मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पुष्पोत्सवावर महापालिका आयुक्तांनी फुली मारल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
या पुष्पोत्सवाची तयारी महापालिका मुख्यालयात मोठ्या जोमाने सुरू करण्यात आली होती. जवळपास 50% पेक्षा जास्त काम झाले होते तर उद्यान विभागाकडून सूक्ष्म नियोजन करण्यात आले होते. यंदा मराठी तसेच हास्य कलाकारांची मांदीयाळी देखील नाशिककरांना पाहायला मिळणार होती. दरवर्षी नाशिककर महापालिकेच्या पुष्पोत्सवाची वाट पाहतात, मात्र इतर ठिकाणी कोट्यवधी रुपये खर्च होत असताना फक्त काही लाखांसाठी महापालिका आयुक्तांनी पुष्पोत्सवाला रद्द केल्यामुळे पुष्पप्रेमींमध्ये नाराजी दिसून येत आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा
यंदाच्या पुष्पोत्सवासाठी आयुक्त खत्री यांनी 47 लाख 37 हजार रूपयांच्या खर्चाला मान्यता दिल्याने दि. 7 ते 9 फेब्रुवारी या कालावधीत पुष्पोत्सव घेण्याचे निश्चित झाले होते. त्यासाठी महापालिकेमध्ये काम देखील सुरू आहे. मात्र, सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी खर्चाची बचत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याने उत्सवावर 47 लाख रुपये खर्च करण्याची बाब उचित नसल्याचे कारण देत आयुक्त खत्री यांनी आता आपल्या अधिकारात ऐनवेळी पुष्पोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला.