Saturday, May 4, 2024
Homeनाशिकमनपा आरोग्य विभाग सतर्क

मनपा आरोग्य विभाग सतर्क

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक महानगरपालिकेच्या ( NMC) हद्दीत मागील दोन तीन दिवसांपासून 30 व्यक्ती करोनाबाधित आढळून ( Corona Patients )आल्याने पालिकेचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. राज्यातही शुक्रवारी तीन हजार रुग्ण वाढल्याचे राज्याच्या आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. दरम्यान नाशिक शहरात शुक्रवारी 14, गुरुवारी 13 व बुधवारी 7 असे एकूण तीस रुग्ण करोनाबाधित आढळून आले आहेत. या पार्श्वभूमिवर शहरात करोना चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात आल्याचे महापालिका आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांनी माहिती दिली आहे.

- Advertisement -

नाशिक शहरात यापूर्वी दिवसाला दोनशे करोना चाचणी केल्या जायच्या, मात्र आता हीच संख्या चारशेवर नेण्यात आली आहे. करोनाबाधित व्यक्तीवर नियमांप्रमाणे औषधोपचार केले जात आहे. करोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी लक्षणे तीव्र नसल्याचे दिसून येत आहे. राज्यासह देशात करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे. नाशिक शहरातही यावर पालिकेची आरोग्य यंत्रणा लक्ष ठेवून आहेत.

करोना लसीचा पहिला डोस तब्बल 96 टक्के लोकांनी घेतला आहे. शहरातील 32 ठिकाणी विविध भागात लसीकरण केद्राची व्यवस्था करण्यात आलेली आहे. पहिला, दुसरा व बुस्टर डोस लसीकरण केद्रावर दिले जात आहे. विशेषत: पालिकेकडून 1 जून ते 31 जुलैपर्यंत हर घर दस्तक मोहीम दोन राबवली जात आहे.

यामध्ये वैद्यकीय पथक घरी येऊन कोविड 19 लसीकरण केले जाणार आहे. त्यामुळे लसीकरण करुन घेणे हाच एकमेव पर्याय उपलब्ध आहे. ज्या नागरिकांचा पहिला, दुसरा किंवा वयवर्षे साठ पुढील नागरिकांचा प्रिकॉशन डोस बाकी असेल अशा नागरिकांनी लसीकरण करुन घेण्याचे आवाहन पालिकेने यापूर्वीच केले आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये करोनाची चौथी लाट येऊ नये, याकरिता या उपाययोजना केल्या जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या