नाशिक । प्रतिनिधी Nashik
नाशिक शहराचा ( Nashik City ) झपाट्याने विकास होत आहे. यामुळे महापालिकेच्या गरजा वाढल्या आहेत. नाशिक महापालिकेचे शासनाकडे असलेले प्रस्ताव तसेच विषय एकत्रित यादी करून पाठवावेत, हे सर्व विषय शासन स्तरावर मार्गी लावण्यात येणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे ( Guardian Minister Bhuse )यांनी दिली.
पालकमंत्री भुसे यांनी महापालिकेत येऊन विकासकामांचा आढावा घेतला तसेच विविध प्रकारचे सूचना देखील केल्या. मनपा आणि जलसंपदा विभागातील पाणी आरक्षणाच्या मुद्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लवकरच बैठक घेऊन निर्णय घेऊ, असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. पीएम स्वनिधी उपक्रमात जास्तीत जास्त पथविक्रेत्यांना कर्ज वितरणात नाशिक मनपा राज्यात प्रथम असल्याने भुसे यांनी पंडीत दिनदयाळ उपाध्याय राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानच्या टीमचे कौतुक केले.
मनपा पश्चिम विभागातील प्रभाग क्रमांक सात मधील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे इतिहास संग्रहालय येथे उद्यान व महिलांसाठी रिक्रेशन सेंटर विकसीत करण्यात येत आहे. त्याचे काम त्वरीत मार्गी लावावे अशी सुचना केली. येथे कॅन्टीन, कला दालन, प्रशासकीय इमारतसह 5200 चौ. फुटांची ई-लायब्ररी उभारण्याचे काम सुरु आहे. शहरातील खड्डे तीन आठवड्यात बुजवण्याचा आदेश त्यांनी बैठकीत दिला.
पेठ रोडवर जास्त वाहतूक असल्याने हा रस्ता स्मार्ट सिटी मार्फत विकसित करण्याची शक्यता पडताळून बघणे अथवा पीडब्लूडी मार्फत निधी प्राप्त करून घेउन सदरचा रस्ता पूर्णतः काँक्रिटीकरण करणे आवश्यक असल्याचे सांगितले. एसआरए अंतर्गत सर्व्हे करुन शहरातील झोपडपट्टींचा विकास होण्याच्या दृष्टीने योजनेत समावेश करा, गोदावरी पूररेषा नियंत्रण बाबत त्वरीत कार्यवाही करावी अशी सुचना केली. आरोग्य, शिक्षणाला प्राधान्य देण्याची सूचना पालकमंत्र्यांनी केली. तसेच राज्यातून 100 मॉडेल शाळा तयार करण्यात येणार आहेत. त्यात कंपाऊंड, स्वच्छतागृह, ई-लर्निंग अशा सुविधा देऊन शिक्षणाचा दर्जा सुधारण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले. मनपासह सर्व लोकप्रतिनिधीनीही यासाठी निधी वळवावा, अशी सूचना केली.
चित्रनगरी प्रकल्पावर मंथन
दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या मुद्यावर आ. सीमा हिरे यांनी खासगीकरणाचा प्रयोग करण्याची सूचना केली. तर आ. देवयानी फरांदे यांनी दादासाहेब फाळके राष्ट्रीय पुरस्कार सोहळाच दिल्ली ऐवजी नाशिकमध्ये दादासाहेब फाळके स्मारकात व्हावा, त्याचा निधी केंद्राने द्यावा, त्यामुळे नाशिकच्या विकासाला आणखी चालना मिळेल, अशी सूचना केली. याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठवला जाईल, असे आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सांगितले. महिला व बालकल्याण विभागाचा निधी इतरत्र वळवू नये, अशीही सूचना त्यांनी केली. मिर्ची हॉटेलजवळ झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ट्रॅव्हल बससाठी कन्नमवार पुलाखाली नदी पात्र लगत वाहनतळ उभारण्याची सूचना राहुल ढिकले यांनी केली. तसेच या पार्किंगच्या जागेचा पुर्नउपयोग करता येईल का, याबाबतही विचार व्हावा, अशी सूचना केली. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी द्वारका व मुंबई नाका भागातील टॅक्सी स्टँण्ड व ट्रॅव्हल्सचे वाहनतळची देखील नदी लगत स्थलांतरित करण्याची सूचना देवयानी फरांदे यांनी केली. यावेळी खा. हेमंत गोडसे उपस्थित होते.
माहिती सादर
पाणीपुरवठा व मलनिस्सारण विभाग, बांधकाम, नगर नियोजन, शिक्षण, आरोग्य, प्रशासन, डे-एनयूएलएम आदी विभागांनी विविध प्रकल्पांचे सादरीकरण केले. आगामी सिंहस्थ कुंभमेळा निमित्त भूसंपादन, रामकुंड परीसर विकसीत करणे, रिंगरोड विकसीत करणे, साधुग्राम अंतर्गत सुविधा देणे याबाबत शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांनी माहिती दिली. मेट्रो आणि नमामी गोदा प्रकल्पाबाबतही माहिती देण्यात आली.