पाथर्डी | Pathardi
पाथर्डी शहराला पाणीपुरवठा करणार्या जायकवाडी धरणात पुरेसा पाणीसाठा असूनही पाणीपुरवठा विभाग, वीज वितरण कंपनी, पाणी योजनेचे ठेकेदार, पालिकेमधील अधिकार्यांच्या परस्पर समन्वयाच्या अभावाने शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून एका महिन्यात फक्त पाच वेळा तेही पाऊण तास पाणी मिळत आहे. कडक उन्हामुळे खाजगी बोरपंपांना सुद्धा घरघर लागली आहे पाणी मिळवायचे कुठून असा प्रश्न नागरिकांना पडला असून ऐनवेळी विकत सुद्धा पाणी मिळत नाही इतकी बिकट परिस्थिती शहरात निर्माण झाली आहे.
पाथर्डी शहराला चार पैकी एका विभागामार्फत संबंधित विभागात पाणीपुरवठ्यासाठी किमान तीस लाख लिटर पाणी एकावेळी लागते. शहराला दैनंदिन किमान सव्वा कोटी लिटर पाणी लागते. ऐनवेळी जारचे पाणी विकत मिळत नाही. शहरात उपनगरांमध्ये काही बोरपंपांना यापूर्वी पाणी होते कडक ऊन व बेसुमार उपशामुळे बोरपंपांचे पाणी कमी होत आहे. नळ पाणी योजनेच्या पाण्याशिवाय परिसरात सार्वजनिक स्वरूपाचा कोणताही उद्भव नसून पालिकेच्या मालिकेचे बहुतेक बोर बंद पडले आहेत.
परिसरातील वस्त्यांवरील विहिरी व अन्य खाजगी बोअर वरून मिळेल तसे पाणी दिवसभरातून कधीही आणावे लागते. उपनगरांमध्ये तर घराबाहेर साठवून ठेवलेले पाणी रात्रीतून कोणीतरी घेऊन जातात. शाळा कॉलेज उघडल्याने सुमारे पाच हजार विद्यार्थी शहरात वाढले आहेत. विविध वसतीगृहे व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पुरेसे पाणी मिळत नसल्याने पाणी बाटल्यांमधील गरम झालेले पाणी विद्यार्थ्यांना प्यावे लागत आहे. दररोज वेगवेगळे पाणी पिऊन विविध आजार वाढले आहेत.
पूर्वी दोन दिवसानंतर पाणी मिळे. ते आता सहाव्या दिवशी अथवा सातव्या दिवशी पाणी मिळते. पालिकेने शहराचे चार विभाग करून मिळणारे पाणी आवर्तन पद्धतीने विविध विभागात शहरात सोडले जाते. पाथर्डी शहरापेक्षाही शेवगाव शहराची परिस्थिती यापेक्षा भीषण असून दोन्ही पालिकांना एकाच योजनेतून पाणीपुरवठा होतो. तीव्र पाणी प्रश्नावर लोकप्रतिनिधी, विरोधी पक्षाचे नेते, असे सर्वजण गप्प आहेत. भारनीयमन, वादळ वार्याने पुरवठा खंडित झाल्यास वाढीव तासाचे पाणी मिळत नाही. सकाळी 11 वाजल्या नंतर ग्रामीण विभागाकडून पाणी घेतले जाते. विजे अभावी पाणी सुद्धा पूर्ण दाबाने मिळत नाही.
समन्वयाचा प्रयत्न
याबाबत पालिकेचे मुख्याधिकारी संतोष लांडगे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, शहराला सहाव्या दिवशी पाणी मिळते. ताशी दोन लाख लिटर पाणी मिळत होते. ते आता एक लाख 46 हजार लिटर मिळते. विजेची सार्वत्रिक मागणी वाढल्याने पूर्ण दाबने वीज मिळत नाही. याकडे पालिकेने गटविकास अधिकारी व पाणीपुरवठा विभागाचे लक्ष वेधले आहे लवकरच या समस्येतून मार्ग निघेल असे लांडगे म्हणाले.