अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्ह्यातील 11 नगरपरिषद व 1 नगरपंचायतीच्या निवडणुकीचा प्रचार वेग पकडत असताना, चिन्ह वाटपात झालेल्या विलंबामुळे अपक्ष उमेदवारांची मोठी कोंडी झाली आहे. राजकीय पक्षांचे उमेदवार मात्र पक्षचिन्ह हाती घेत यापूर्वीच प्रचारात उतरले असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह मोठ्या नेत्यांच्या सभा धडाक्यात सुरू आहेत. दरम्यान, निवडणूक कार्यक्रमानुसार काल बुधवारी (26 नोव्हेंबर) अखेर अपक्ष उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात आले. आता त्यांच्याकडे हातात प्रचारासाठी फक्त चार दिवसांचीच मुदत राहिली आहे. 30 नोव्हेंबर रोजी प्रचार थांबणार असल्याने अल्प अवधीत मतदारांपर्यंत चिन्ह पोहोचविण्याचे मोठे आव्हान या उमेदवारांसमोर उभे राहिले आहे.
जिल्ह्यातील 12 पालिकांमधील सदस्यपदाच्या 289 जागांसाठी तब्बल 1,274 उमेदवार उरले आहेत. तर नगराध्यक्ष पदासाठी 102 उमेदवार रिंगणात आहेत. यातील बहुतांश उमेदवार हे विविध राजकीय पक्षांच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही माघारीनंतर चिन्ह वाटप होणे अपेक्षित होते. मात्र, यावेळी निवडणूक कार्यक्रमाची कालमर्यादा अत्यंत कमी असल्याने अपक्षांची अडचण वाढली आहे. 18 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत होती. त्यानंतर 21 नोव्हेंबरपर्यंत माघारीची मुदत होती. या मुदतीनंतर राज्य निवडणूक आयोगाने 25 नोव्हेंबरपर्यंत अपील करण्याची संधी दिली होती. आणि अपिलांचे कामकाज पूर्ण झाल्यानंतर काल, बुधवारी (26 नोव्हेंबर) चिन्ह वाटप केले व उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने अर्ज माघारी आणि चिन्ह वाटप यात तब्बल पाच दिवसांचा अवधी घेतला. यामुळे अपक्षांच्या वाट्याला प्रचारासाठी अत्यल्प वेळ उरला आहे. अनेक अपक्ष उमेदवारांनी आयोगाविरूध्द नाराजी व्यक्त केली आहे. कारण आता त्यांच्या हाती चिन्ह मिळाल्यानंतर चिन्हाचे पत्रक, पोस्टर्स, बॅनर तयार करणे, परवानग्या घेणे, मतदारांपर्यंत चिन्हाची ओळख पोहोचवणे हे सर्व केवळ 27 ते 30 नोव्हेंबर या चार दिवसांत पूर्ण करणे त्यांच्या दृष्टीने अत्यंत कठीण झाले आहे. गावागावात जाऊन चिन्ह ओळख करून देण्यासाठी आता अपक्षांना अक्षरशः धावपळ करावी लागणार आहे.
पक्षीय उमेदवारांचा प्रचार मात्र जोरात
दुसरीकडे, राजकीय पक्षांचे उमेदवारांचे अर्ज वैध ठरल्याने त्यांना लगेचच पक्षचिन्ह प्राप्त झाले. त्यानंतर त्यांनी प्रचारयात्रा, पदयात्रा यांना वेग दिला आहे. मोठ्या नेत्यांच्या सभा, सोशल मीडिया प्रचार आणि बुथनिहाय नियोजन या उमेदवारांना आघाडी देत आहेत. अपक्षांना मात्र आता या वेगाशी स्पर्धा करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे.





