Saturday, May 30, 2026
HomeनगरAhilyanagar : आठ पालिकांच्या ईव्हीएमचे ‘स्ट्राँग’ संरक्षण

Ahilyanagar : आठ पालिकांच्या ईव्हीएमचे ‘स्ट्राँग’ संरक्षण

21 डिसेंबरपर्यंत 24 तास दुहेरी सुरक्षा बंदोबस्त तैनात

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

- Advertisement -

जिल्ह्यातील आठ नगरपालिकांच्या निवडणुकांनंतर ईव्हीएम मशिनची काटेकोर सुरक्षितता राखण्यासाठी प्रशासनाने कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. मंगळवारी (2 डिसेंबर) मतदान पार पडल्यानंतर रात्री उशिरा सर्व स्ट्राँग रूम्स सीलबंद करण्यात आले. सुरूवातीला 3 डिसेंबर रोजी मतमोजणीची तारीख जाहीर झाली होती; मात्र निवडणूक आयोगाने काही पालिकांची निवडणूक पुढे ढकलल्याने आता सर्व नगरपालिकांची मतमोजणी 21 डिसेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे प्रत्येक स्ट्राँग रूमभोवती दोन स्तरांमध्ये सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली असून मतमोजणीपर्यंत ही व्यवस्था कायम राहणार आहे.

श्रीरामपूर, संगमनेर, राहाता, राहुरी, शिर्डी, शेवगाव, श्रीगोंदा व जामखेड या आठ नगरपालिकांमध्ये मतदान शांततेत पार पडले. अनेक ठिकाणी सायंकाळनंतरही रांगा कायम असल्याने मतदान रात्रीपर्यंत सुरू होते. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी, पोलीस अधिकारी आणि उमेदवार प्रतिनिधींच्या उपस्थितीत सर्व ईव्हीएम मशीन सीलबंद करण्यात आले आणि रात्रीच स्ट्राँग रूममध्ये हलवून ठेवण्यात आले. प्रशासनाने निश्चित केलेल्या मतमोजणी केंद्रांच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या स्ट्राँग रूम्सभोवती 24 तास कठोर पहारा ठेवण्यात आला आहे. पहिला स्तर हा राज्य राखीव पोलीस दलाच्या एका सेक्शनचा समावेश असून, त्यात 10 अंमलदार तैनात आहेत. दुसरा स्तर जिल्हा पोलीस दलाचे आठ अंमलदार आणि त्यांच्या देखरेखीसाठी दोन अधिकारी सतत कार्यरत असणार आहेत. एकूण 20 जणांचा सुरक्षा बंदोबस्त प्रत्येक स्ट्राँग रूमला 24 तासासाठी उपलब्ध आहे.

सुरक्षिततेसाठी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे, बॅरिकेटिंग आणि प्रवेशबंदी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. उमेदवारांच्या प्रतिनिधींना वेगळा प्रतिक्षा कक्ष देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. स्ट्राँग रूम परिसरात येणार्‍या प्रत्येक व्यक्तीची नोंद ठेवण्यासाठी नोंदवहीची व्यवस्था करण्यात आली आहे. कोण कोण आला, कोणत्या उद्देशाने आला, याची तंतोतंत नोंद त्या वहीत केली जाते. संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दर 24 तासांत किमान एकदा स्ट्राँग रूमला भेट देणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी यांनाही वेळोवेळी भेटीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ईव्हीएमला धोकादायक ठरू शकणार्‍या उंदीर, घुस, पाण्याची गळती, आग यांसारख्या धोके टाळण्यासाठी स्ट्राँग रूम्सची खबरदारी घेण्यात आली आहे.

सीसीटीव्हीचा ‘वॉच’
सर्व स्ट्राँग रूम भोवती सीसीटीव्ही बसविण्यात आले आहे. या कॅमेर्‍यांचे लाईव्ह स्क्रिनवर पाहण्याची सुविधा आहे. उमेदवार प्रतिनिधींना हे पाहण्यासाठी या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. आठ राजपत्रित अधिकारी सुरक्षा व्यवस्थेवर लक्ष ठेवून आहेत. दररोज सकाळी आणि संध्याकाळी सर्व सीसीटीव्ही कॅमेरे सुरळीत चालू आहेत का? अग्निशामक यंत्रणा सुस्थितीत, बंदोबस्त, लॉक आदींचा अहवाल निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना देणे बंधनकारक आहे.

या ठिकाणी आहेत ‘स्ट्राँग रूम’
जामखेड- श्री नागेश्वर सामाजिक सभागृह, शिर्डी- श्री साईबाबा आयटीआय कॉलेज, संगमनेर- सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात क्रिडा संकुल, राहुरी- लोकनेते कै. रामदास पाटील धुमाळ महाविद्यालय, श्रीगोंदा- शासकीय धान्य गोडावून, पेडगाव रस्ता, शेवगाव- तहसील कार्यालय, राहाता- राहाता नगरपालिका प्रशासकीय इमारत, श्रीरामपूर- नवीन प्रशासकीय तहसिल कार्यालय.

ताज्या बातम्या

IPL 2026 – RR VS GT : गिलच्या शतकाचा धमाका! गुजरात...

0
आयपीएल २०२६च्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात आज गुजरात ने राजस्थान वर दमदार विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली. न्यू चंदीगडच्या मुल्लांपूर मैदानावर झालेल्या या हायव्होल्टेज...