Thursday, October 31, 2024
Homeशब्दगंधमुरलीमनोहराचा कर्मसिध्दांत!

मुरलीमनोहराचा कर्मसिध्दांत!

सु. ल. हिंगणे, अध्यात्म अभ्यासक S. L. Hingane, spiritual practitioner

कर्मसिद्धांत सांगणारे भगवान श्रीकृष्ण हे खऱ्या अर्थाने जीवनगुरू आहेत. कारण आपल्या जीवनाची दशा आणि दिशा कर्मावरूनच निश्चित होते. कर्माला असलेले प्राधान्य श्रीकृष्णाच्या संदेशांमध्ये सर्वांत महत्त्वाचे आहे. म्हणूनच ते ईेशरी रूपात सर्वसामान्य जनतेत मिसळून गेलेले दिसतात. केवळ मनुष्यच नव्हे तर सर्व प्राणिमात्रांबद्दलचा त्यांचा एकात्मभाव अवर्णनीय आहे. जनकल्याणाची भावना मानवी व्यवहार आणि संस्कारांमधील शालीनता यावरूनच दिसून येते.

- Advertisement -

भगवान श्रीकृष्ण Lord Krishna मानवतेचे प्रतिनिधी आणि लोककल्याणाचे मार्गदर्शक आहेत. जनमानसाच्या आत्म्यात विराजमान झालेले आहेत, ज्यांचे जीवन अगणित कहाण्या आणि लीलांनी व्यापलेले आहे. म्हणूनच धार्मिक, सामाजिक, दार्शनिक आणि राजनैतिक अशा सर्व क्षेत्रांत सारथ्याच्या भूमिकेत त्यांना सच्चे हितचिंतक मानले जाते. तसे पाहता श्रीकृष्ण हे साहित्य आणि कलेचेही समग्र रूप आहेत. जीवनात विेशास आणि मर्यादेची साथ कायम ठेवणे जितके महत्त्वाचे तितकेच आनंद आणि प्रेमही महत्त्वाचे आहे, असे ते सांगतात. त्यांचे जीवन जितके रोचक तितके मानवीय आहे. त्यामुळेच त्यांचे चरित्र सामान्य माणसाला खूप शिकवत, समजावत जीवन जगण्याचा अर्थपूर्ण संदेश देते. बालपणापासून कौटुंबिक जीवनापर्यंत त्यांच्या प्रत्येक गोष्टीत जीवनाची सूत्रे लपली आहेत.

माणसाचा विचार आणि व्यवहार त्याची स्वतःचीच नव्हे तर समाज आणि देशाचीही दिशा निश्चित करतो. या दोन्ही बाजूंच्या परिष्करणावर श्रीकृष्णांचे विचार जोर देतात. सार्थकता आणि संतुलन या तत्त्वांसाठी समर्पित आणि समस्यांशी झुंजण्याची इच्छाशक्ती प्रबळ करणारी जीवनशैली ते सुचवितात. गीतेमध्ये वर्णन करण्यात आलेले त्यांचे संदेश जीवनसंग्रामात अटळ विेशासाने उभे राहण्याची शिकवण देतात.

महान तत्त्ववेत्ते श्री अरविंद यांनी सांगितले होते की, भगवद्गीता हा केवळ एक ग्रंथ किंवा धर्मग्रंथ नसून, एक जीवनशैली आहे. प्रत्येक वयोगटातील व्यक्तीला ती वेगळा संदेश आणि प्रत्येक संस्कृतीला वेगळा अर्थ समजावून सांगते. जागतिक ख्यातीचे शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइन यांनीही म्हटले होते की, श्रीकृष्णाचे उपदेश अतुलनीय आहेत. कृष्णाशी संबंधित प्रत्येक गोष्ट आपल्याला जीवनाप्रती जागरूक होण्याचा संदेश देते. जीवन जगणे हीसुद्धा एक कला आहे, याची शिकवण मानवी मन आणि जीवनाचे कुशल मार्गदर्शक असणारे श्रीकृष्ण किती सहजतेने देतात! राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनीही असे म्हटले आहे की, जेव्हा एखादे संकट मला घेरते, तेव्हा मी गीतेची पाने चाळतो. मानवी विचार आणि जनकल्याणाचे खंबीर समर्थक म्हणूनच आपण बापूजींना ओळखतो.

आज आपल्याला अनेक पातळ्यांवर निसर्गाच्या नाराजीचा सामना करावा लागत आहे. पूर, दुष्काळ, भूकंप यांसारख्या आपत्तींचा कहर जगभरात वाढत चालला आहे. निसर्गाचे बेसुमार दोहन हेच त्याचे कारण आहे. या पोर्शभूमीवर निसर्गाच्या खूप जवळीक सांगणारे श्रीकृष्णाचे जीवन आपल्याला मोठी शिकवण देते. निसर्गाप्रती त्यांना जी आत्मीयता होती ती समाज आणि राष्ट्राशीही स्वतःला जोडून घेणारी होती. कदंबवृक्ष आणि यमुनेचा किनारा यांचे त्यांच्या जीवनात मोठे स्थान आहे. निसर्गाची जोड असल्यामुळेच त्यांचे जीवन हे विलक्षण आनंद आणि उत्साहाचे प्रतीक बनते. ते जिथे राहिले, त्या परिसरातील प्रत्येक वस्तूशी त्यांचा आत्मिक संबंध जुळून आला. झाडेझुडपे असोत वा जीवजंतू, संपूर्ण निसर्गाच्या चेतनेशी स्वतःला जोडून घेणे हीच खरी मानवता आहे.

वसुधैव कुटुम्बकम् हा भाव वासुदेव श्रीकृष्णाने मनापासून जगला आहे. जीवन निसर्गातूनच जन्म घेते आणि निसर्गमाताच जीवन विकसित करते; त्याचे पोषण करते, हे कान्हाच्या गायींवरील आणि पशुपक्ष्यांवरील प्रेमातून दिसून येते. कधीकधी खरोखर असे वाटते की, आपल्या सर्वांमध्ये चेतना तत्त्वाचा विकास तेव्हाच होईल, जेव्हा आत्मतत्त्व जागृत होऊ शकेल. निसर्गाशी असलेल्या घनिष्ट संबंधांचा हा भाव मानवीय विचार साकार करणारा आहे. याच कारणामुळे विचार, व्यवहार आणि आपुलकीचा हा भाव आजच्या धावपळीच्या जीवनात सर्वाधिक गरजेचा आहे.

मानवी स्वभावातील विकृती आणि सामाजिक कुप्रथांच्या विरोधात जनजागरण करणारे योगेेशर कृष्ण खऱ्या अर्थाने अत्याचार आणि अहंकाराचे विरोधक आहेत. त्यांचे चिंतन राष्ट्र आणि समाजासाठी हितकारक विचारांना प्रोत्साहित करणारे आहे. सामान्य माणसांना अत्याचाराविरुद्ध लढण्याचा आणि जागरूक राहण्याचा संदेश ते देतात. कर्मयोगी श्रीकृष्ण दमनाच्या विरोधात तर आहेतच; शिवाय मनाच्या पूर्णत्वाचे समर्थकही आहेत. फाटाफुटीने व्यापलेल्या आजच्या काळात राष्ट्राच्या, राज्याच्या उन्नतीला समर्पित असलेले त्यांचे विचार खर्या अर्थाने दिशा देणारे ठरू शकतात. त्यांच्या प्रत्येक कृतीत जगाच्या कल्याणाचा उद्देश सामावलेला आहे.

चेहऱ्यावर स्मितहास्य आणि मेंदूत कर्म आणि दिशेचे ज्ञान. बालसुलभ गोष्टी आणि जीवनाच्या गूढ समस्यांच्या सोडवणुकीचे सखोल ज्ञान. हेच त्यांच्या चमत्कारी व्यक्तिमत्त्वाचे सर्वांत आकर्षक पैलू आहेत. म्हणूनच श्रीकृष्णाचा दूरदर्शी विचार समस्येवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करताना दिसतो. उदासपणा आणि नकारात्मकतेचे ते विरोधी आहेत. जीवनाची लढाई संयम आणि साध्या विचारांनी लढायला हवी, असे ते आपल्याला शिकवतात; समजावतात. जीवनात येणार्या प्रत्येक प्रकारच्या परिस्थितीमध्ये कधी धैर्याची तर कधी सखोल ज्ञानाची गरज असते, असे त्यांचे जीवनचरित्र अधोरेखित करते. सध्या संकट बनून आलेला कोरोना काळ तर जणू प्रत्येक पातळीवर आपल्या धैर्याची परीक्षा पाहत आहे.

आजच्या काळातही नागरिकच एखाद्या देशाचा पाया मजबूत करतात, हे खरेच आहे. देशात राहणार्या लोकांची वैचारिक पोर्शभूमी आणि व्यवहार यावरून त्या देशाचे भवितव्य कसे असेल हे निश्चित होते. जनकल्याणाची भावना मानवी व्यवहार आणि संस्कारांमधील शालीनता यावरूनच दिसून येते. बहुतांश समस्यांचे निराकरण नागरिकांचा विचार आणि व्यवहार यावरच अवलंबून असते. अशा स्थितीत श्रीकृष्णाचा कर्मशील होण्याचा संदेश सृजनाचा मार्ग सांगणारा ठरतो. राष्ट्रीय आणि सामाजिक संदर्भातही तो विचार लागू होतो. म्हणूनच कर्मावर विेशास ठेवण्याची शिकवण देणार्या मुरलीमनोहराचे तत्त्वज्ञान आजच्या काळातही प्रासंगिक आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या