नांदगाव | प्रतिनिधी | Nandgaon
तालुक्यातील न्यायडोंगरी गावात खुनाचे सत्र थांबता थांबेना एका महिन्याच्या काळात आज पुन्हा तिसऱ्या खूनाची घटना घडल्याने न्यायडोंगरी गाव हदरून गेले आहे. मागील काही दिवसांपूर्वी मुलाच्या मदतीने पत्नीने दारुड्या पतीला संपवले. त्यांनतर डॉक्टर पतीने वडिलांच्या मदतीने डॉक्टर पत्नीला संपवले. या घटना ताज्या असतानाच आज न्यायडोंगरी येथे अज्ञात व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या झाल्याची घटना घडली आहे…
न्याडोंगरी ते परधाडी रोडच्या कडेला असलेल्या शेती गट नंबर 847/3 या ठिकाणी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. दगडाने ठेचून त्याचा खून करण्यात आला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. खून झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेतला. नांदगाव येथील शासकीय रुग्णालयात मृतदेह शवविच्छदनासाठी हलविण्यात आला आहे.
‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
मयताची ओळख पटवून या व्यक्तीचा खून कोणी केला व का केला? याचा तपास करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मनमाड येथील उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख, नांदगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.