अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
रात्रीच्या वेळी तोंडाला मास्क लावून आलेल्या सहा ते सात जणांच्या टोळक्याने बेकरीमध्ये झोपलेल्या तरुणांवर तलवार, लाकडी दांडके, दगडाने हल्ला करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मारहाणीत तिघे जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास सावेडी उपनगरातील वाणीनगर येथील फाईव्ह स्टार बेकरीत हा प्रकार घडला. दरम्यान हल्ल्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. संशयित हल्लेखोरांचा शोध घेतल्यानंतरच कारण स्पष्ट होईल असे पोलिसांनी सांगितले.
कसीम कासार, मोहंमद जैद मोहंमद जाईद अन्सारी व नाजीम कासार (रा. नगर) हे जखमी झाले आहेत. जखमी अन्सारी यांच्या फिर्यादीवरून सहा ते सात अनोळखी व्यक्तींविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, आर्म अॅक्ट आदी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाणीनगर येथील बजरंग शाळेजवळ कसीम कासार यांची फाईव्ह स्टार नावाची बेकरी आहे. या बेकरीत फिर्यादी अन्सारी यांच्यासह सात ते आठ उत्तर प्रदेशातील कामगार काम करतात. मंगळवारी रात्री ते सर्व जण जेवण करून बेकरीमध्येच झोपले होते. तेथे साडेअकराच्या सुमारास दुचाकीवरून सहा ते सात अनोळखी व्यक्ती तोंडाला मास्क लावून आले. त्यांच्या हातात तलवार, दांडके व दगडे होती. त्यांनी काही एक कारण नसताना शिवीगाळ करून जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण करण्यास सुरूवात केली.
कासीम कासारच्या डोक्यात तलवार व लाकडी दांडक्याने हल्ला केल्याने ते गंभीर जखमी होऊन जागीच कोसळले. हल्लेखोरांनी फिर्यादी अन्सारी यांच्यासह नाजीम कासार यांना मारहाण केल्याने ते जखमी झाले आहेत. हल्लेखोरांनी दहशत केल्याने बेकरीतील कामगार तेथून पळून गेले. बेकरीच्या बाहेर उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे.
दरम्यान काही वेळाने हल्लेखोर पसार झाल्यानंतर फिर्यादी अन्सारी यांनी त्यांच्या ओळखीचे संकेत बारस्कर यांना घटनेची माहिती दिली. त्यांनी सर्व जखमींना रिक्षातून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. गंभीर जखमी झालेल्या कासीम कासार यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हल्लेखोरांचा शोध सुरू
रात्रीच्या वेळी तोंडाला मास्क लावून आलेल्या सहा ते सात हल्लेखोरांची नावे जखमींना माहिती नसल्याने त्यांची ओळख पटवून त्यांना अटक करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. त्यांची ओळख पटवून शोध घेण्याचे काम स्थानिक गुन्हे शाखा व तोफखाना पोलिसांकडून सुरू आहे.