Friday, May 3, 2024
Homeनगरझारखंड, उत्तराखंडला गेलेले पोलीस रिकाम्या हाती परतले

झारखंड, उत्तराखंडला गेलेले पोलीस रिकाम्या हाती परतले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

औरंगाबाद रोडवरील जेऊर बायजाबाई शिवारात शेतामध्ये 6 मार्चला मृत अवस्थेत आढळून

- Advertisement -

आलेल्या तरुणाची व 7 जून रोजी निंबळक बायपास जवळील काटवनात आढळलेल्या एका 35 ते 40 वर्षीय मृत महिलेची ओळख एमआयडीसी पोलिसांना पटलेली नाही. या दोन्ही मृत व्यक्तींची ओळख पटविण्यासाठी व त्यांच्या मारेकर्‍यांचा तपास लावण्यासाठी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे एक पथक झारखंड, उत्तराखंड राज्यात जाऊन आले.

परंतु, मृत तरुण व महिलेची ओळख पटली नसल्याने कोणत्या कारणासाठी त्यांचा खून करण्यात आला? त्यांचे मारेकरी कोण? या प्रश्नांची उत्तरे पोलिसांना अद्याप मिळाली नाही. परराज्यात पंधरा दिवसांचा तपास दौरा केल्यानंतरही पोलीस खाली हाताने परत आले आहे.

औरंगाबाद रोडवरील जेऊर बायजाबाई शिवारात भागवत तुकाराम विधाते यांच्या शेतामध्ये 6 मार्चला 25 ते 30 वर्षे वय असलेल्या एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. या तरुणाच्या डोक्यावर व शरिरावर गंभीर स्वरूपाच्या जखमा होत्या. त्याचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह शेतामध्ये आणून टाकला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे.

नाशिक येथील फॉरेन्सिक लॅबच्या रिपोर्टनंतर त्या तरुणाचा खूनच झाला असल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र, अद्याप एमआयडीसी पोलिसांना या तरुणाची ओळख पटविण्यात यश आले नाही. त्यामुळे त्याचे मारेकरी कोण? हे सिद्ध झाले नाही. तसेच, 7 जून रोजी निंबळक बायपास जवळील काटवनात एका 35 ते 40 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला होता.

शवविच्छेदन अहवालात ओढणीने गळा दाबल्यामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मात्र, महिलेची ओळख पटली नसल्याने खुनाचे गुढ उकलले नाही. महिलेची ओळख पटविण्यासाठी जिल्ह्यासह बाहेरील पोलीस ठाण्यात मिसिंग केस तपासल्या गेल्या. वृत्तपत्रातून महिलेचे वर्णन प्रसिद्ध केले गेले.

सदर महिला ही बंगाली असल्याने व तो तरुण हा एखाद्या ट्रकवरील ड्रायव्हर असल्याने पोलिसांनी परराज्यात तपाससाठी पथक पाठविले. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पथक झारखंड राज्यातील तीन ते चार जिल्ह्यांत जाऊन आले. तसेच उत्तराखंडमधील हरिद्वार येथेही हे पथक जाऊन आले. परंतु, दोन्ही मृतदेहांची ओळख पटली नसल्याने त्यांचे मारेकरी कोण? हा तपास करणे पोलिसांसमोर आवाहन आहे.

लोक सहकार्य करत नाही

तपासासाठी बाहेरच्या राज्यात गेल्यानंतर त्याठिकाणचे स्थानिक लोक सहकार्य करत नाही. यामुळे तपासकामात अडचणी येतात. मृतदेहाची ओळखच पटली नसल्याने त्यांचे मारेकरी कोण हे शोधणे अवघड असल्याचे पोलिसांनी सांगितले. करोना काळात बाहेर राज्यामध्ये अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते असेही पोलिसांनी सांगितले.

मृत तरुण व महिलेच्या तपासकामी एमआयडीसी पोलिसांचे एक पथक झारखंड, उत्तराखंडमध्ये पाठविले होते. अजून मृत व्यक्तींची ओळख पटली नाही. तपास सुरू असून सर्व शक्यता पडताळून पाहिल्या जात आहेत.

– अजित पाटीत (उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर ग्रामीण)

- Advertisment -

ताज्या बातम्या