Tuesday, April 23, 2024
Homeनगरघारगावात हॉटेलचालकाची हत्या : खुनी सगड्या काळे जेरबंद

घारगावात हॉटेलचालकाची हत्या : खुनी सगड्या काळे जेरबंद

अहमदनगर (प्रतिनिधी) – संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक महामार्गावरील घारगाव शिवारातील हॉटेल प्राईडचे मालक अशिष चंद्रकांत कानडे (रा. कळंब, ता. आंबेगाव)यांची हत्या श्रीगोंद्यातील सुरेगावातील दरोडेखोर सगड्या उंबर्‍या काळे यांच्यासह त्याच्या टोळीने केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून सगड्याला जेरबंद करण्यात आले आहे.

अशिष कानडे यांच्या मालकीचे घारगावात हॉटेल आहे. तेथे ते 18 जानेवारी रोजी नेहमीप्रमाणे झोपले होते. रात्री दरोडेखोरांनी त्यांच्या हॉटेलच्या मागील बाजूची जाळीची साखळी व कुलूप तोडून मालक अशिष कानडे यांची हत्या करून तेथील 40 हजारांची रोख रक्कम व दारूच्या बाटल्या चोरून नेल्या होत्या. या घटनेची फिर्याद सुनील पवार यांनी घारगाव पोलिसांत दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

- Advertisement -

या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास सुरू केला. अशातच पवार यांना हा गुन्हा श्रीगोंदा तालुक्यातील सुरेगाव येथील सगड्या काळे व त्याच्या साथीदारांनी केल्याची गुप्त खबर्‍यामार्फत माहिती मिळाली.

त्यानुसार माहिती घेतली असता सगड्या काळे हा सातारा जिल्ह्यात एका वीटभट्टीवरील त्याच्या ओळखीच्या मजुराकडे राहात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानंतर सगड्या काळेस ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता हा गुन्हा त्याचा भाऊ मिथून उंबर्‍या काळे रा. सुरेगाव व साथीदार पुणेवाडी, पारनेरातील संजय हातन्या भोसले यांनी केला असल्याची कबुली दिली. त्याच्या साथीदारांचा शोध घेण्यात आला मात्र ते मिळून आले नाहीत. सगड्या काळेस घारगाव पोलिसांकडे सोपविण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि संदीप पाटील, सफा सोन्याबापू नानेकर, पोहेकॉ दत्ता हींगडे, पोना सुनील चव्हाण, रवींद्र कर्डिले, अण्णा पवार, योगेश सातपुते, मच्छिंद्र बर्डे, प्रकाश वाघ, सागर सुलाने, सचिन कोळेकर, यांनी केली.

सगड्या काळेच्या नावावर अनेक गुन्हे
सगड्या उंबर्‍या काळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर पारनेर, श्रीगोंदा, सुपा, बेलवंडी पोलिस स्टेशनला अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या