Saturday, November 16, 2024
Homeनगरसिक्युरिटी गार्डने केली सुपरवायझरची कोयत्याने हत्या

सिक्युरिटी गार्डने केली सुपरवायझरची कोयत्याने हत्या

‘एमआयडीसी’मधील क्रॉम्प्टन कंपनीतील घटना ः देवळालीचा आरोपी

अहमदनगर (प्रतिनिधी) – ड्युटीवरून झालेल्या वादामधून एमआयडीसीतील क्रॉम्प्टन कंपनीमध्ये सिक्युरिटी गार्डने सुपरवायझरची कोयत्याने सपासप वार करून हत्या केल्याची घटना गुरूवारी (दि. 23) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. या घटनेने नगर शहरासह एमआयडीसी परिसरात खळबळ उडाली आहे. राजाभाऊ नामदेव वाघमारे (वय- 50 रा. भिंगार) असे हत्या झालेल्या सुपरवायझरचे नाव आहे. किरण रामभाऊ लोमटे (रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अनिल छबुराव उमाप (रा. सावेडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोमटे विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना घडल्यानंतर आरोपी लोमटे पसार झाला आहे.

- Advertisement -

वाघमारे हे क्रॉम्प्टन कंपनीमध्ये सिक्युरिटी सुपरवायझर म्हणून काम करत होते. याच कंपनीमध्ये लोमटे हा सिक्युरिटी गार्ड म्हणून कामाला आहे. कंपनीचे सिक्युरिटीचे कामकाज एका खाजगी ठेकेदाराकडे आहे. सकाळी आठ ते चार या शिफ्टसाठी वाघमारे सुपरवायझर म्हणून काम पाहत होते. त्यांच्या हाताखाली सहा सिक्युरिटी गार्ड कामाला होते. यातील लोमटे एक होता. नेहमीप्रमाणे वाघमारे यांनी कामाचे नियोजन करून दिले. वाघमारे यांनी सांगितलेल्या कामाचा राग लोमटे याला आला असावा, म्हणून त्याने काम न करता कंपनीच्या बाहेर जाणे पसंत केले. वाघमारे कंपनीच्या आवारात नेहमीप्रमाणे कामकाज करत असताना लोमटे तेथे आला. त्याच्या हातामध्ये ऊस तोडणीचा कोयता होता. त्याने वाघमारे यांच्यावर कोयत्याने सपासप वार केले.

यावेळी घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. वाघमारे यांच्यावर वार करून लोमटे हाती कोयता घेऊन पसार झाला. घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना कळविण्यात आली. पोलीस घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. वाघमारे यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारापूर्वीच वाघमारे यांचा मृत्यू झाला. दरम्यान, घटनेची माहिती एमआयडीसीसह नगर शहरात वार्‍यासारखी पसरली. यानंतर वाघमारे यांच्या नातेवाईकासह, कंपनीच्या कामगारांनी जिल्हा रूग्णालयात गर्दी केली होती.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या