Tuesday, July 2, 2024
Homeक्राईमकोयता घेऊन मध्यरात्री मित्राच्या घरी गेला, सपासप वार करून खून केला

कोयता घेऊन मध्यरात्री मित्राच्या घरी गेला, सपासप वार करून खून केला

दारू व गांजाच्या नशेचा परिणाम || खुनी मित्राला एलसीबीने ठोकल्या बेड्या

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

दारू व गांजाची नशा करणार्‍या मित्रावर कोयत्याने वार करून त्याचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. मांडवे (ता. पाथर्डी) येथील खून प्रकरणात मित्रच खुनी निघाल्याने त्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. अमोल नवनाथ आठरे (रा. कौडगाव आठरे, ता. पाथर्डी) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याने 4 मे 2024 रोजी रात्री त्याचा मित्र अविनाश बाळू जाधव (रा. मांडवे) यांचा खून केल्याची कबुली दिली आहे. अमोल व अविनाश दोघे मित्र होते. अविनाश याने अमोलला गांजा पिण्याचे व्यसन लावले होते. तसेच अविनाश हा अमोलला गांजा व दारूसाठी नेहमी पैशाची मागणी करत होता. त्यांचे दोघांचे नेहमी एकमेकांच्या घरी येणे जाणे होते.

अविनाशला दारू पिण्याचे व गांजा ओढण्याचे व्यसन असल्याकारणाने अमोलचे आई – वडिल त्याला व अविनाशला रागावून बोलत असे. 1 मे 2024 रोजी अविनाशने अमोलच्या वडिलांना तिसगावात गाठले व त्याने शिवीगाळ करून हातपाय तोडून टाकण्याची धमकी दिली. त्यांच्याकडील दूध सांडून दिले. याच कारणातून अमोलने अविनाशला जाब विचारला असता त्याने अमोलला सुध्दा शिवीगाळ, दमदाटी केली होती. त्याच दिवशी अविनाशचा काटा काढण्याचे अमोलने ठरवले होते.
4 मे रोजी रात्री 12 ते 1 सुमारास अमोलने घरातून ऊस तोडण्याचा कोयता घेतला व दुचाकीवरून अविनाशच्या घरी निघाला. रस्त्यात बाभळीचे झाडाची फांदी तोडली. अविनाश त्याच्या घराच्या पढवीत झोपलेला होता. अमोलने त्याला सुरूवातीला काठीने मारले परंतु तो नशेत असल्याचे त्याला समजले नाही. काही वेळातच अमोलने त्याच्याकडील कोयत्याने अविनाशच्या डोक्यात व पाठीवर वार करून खून केला.

याप्रकरणी अविनाशचा भाऊ महेश बाळू जाधव यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना दिले होते. त्यासाठी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलीस अंमलदार मनोहर गोसावी, रवींद्र कर्डिले, सुरेश माळी, संतोष लोढे, संदीप चव्हाण, देवेंद्र शेलार, संतोष खैरे, फुरकान शेख, मेघराज कोल्हे, चंद्रकांत कुसळकर यांचे पथक काम करत होते. त्यांनी गुन्हा उघडकीस आणून संशयित आरोपी अमोल आठरे याला अटक केली.

असा लावला छडा
गुन्हा घडल्यानंतर एलसीबी पथकाने घटनास्थळी भेट दिली. त्याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते. घटना मध्यरात्री घडली असल्याने प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्याने गुन्हा उघडकीस आणण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. पथकाने अविनाशचे कोणासोबत वाद होते का? याची माहिती घेतली असता त्यांचा मित्र अमोल आठरे याचे नाव समोर आले. त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्याने अविनाशचा खून केल्याची कबुली दिली. खुनी अमोल आठरे याला अटक करून पाथर्डी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या