श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda
तालुक्यातील बनपिंप्री येथील हॉटेलमध्ये वेश्याव्यवसायासाठी थेट बांगलादेशमधून महिलांची तस्करी होत असताना आणि त्यातील एक महिलेचा अनैतिक संबधातून खून झालेला असताना हे प्रकरण पोलिसांनी पाहिजे तेवढं गांभीर्याने हाताळले नसल्याचे दिसत असून याप्रकरणात आर्थिक तडजोड झाल्याची चर्चा आहे.
परिसरात अवैध दारूभट्ट्या, जुगाराचे अड्डे, गुटखा विक्री जोमात आहे. बनपिंप्री शिवारात महामार्ग लगतचा वेश्या व्यवसायासह तालुक्यात राजरोसपणे सुरू असलेल्या हॉटेल, लॉजवरच्या वेश्याव्यवसायातून अनेकांचे हात ओले होत असल्याची चर्चा आहे. पोलिसांनी कारवाई मात्र बोटावर मोजता येईल इतक्या जणांवर केली आहे. बनपिंप्रीमधील हॉटेलमध्ये थेट बांगलादेशी महिला वेश्याव्यवसायासाठी आणल्या जात असल्याचे उघड झाले.एक महिन्यापूर्वी नाशिकच्या दहशतवाद विरोधी पथकाने कारवाई करत चार बांगलादेशी महिला ताब्यात घेत श्रीगोंदा पोलिसाकडे गुन्हा दाखल केला.
श्रीगोंदा पोलिसांच्या हद्दीत असे बांगलादेशी घुसखोर वास्तव्याला होते आणि अनेक वर्षापासून हे चालू असताना श्रीगोंदा पोलीस मात्र कुठलीच कारवाई करत नव्हते. आठ दिवसांपूर्वी याच हॉटेलमध्ये वास्तव्याला असलेल्या बांगलादेशी महिलेचा कुजलेला मृतदेह सापडला. यात हॉटेल चालकाचा सहभाग आढळला त्यानेच अनैतिक संबंधाच्या कारणातून त्या महिलेची हत्या केली. पण याचा बोभाटा झाला आणि हॉटेल चालकाला अटक झाली. बाकी त्याचे सहकारी कोण होते?, ती महिला इथे आली कशी? असे अनेक प्रश्न असताना या प्रकरणाचा तपास जितका सखोल व्हायला पाहिजे तेवढा होताना दिसत नाही.
‘पंचवीस खोके आणि एकदम ओके’
श्रीगोंदा तालुक्यातील बनपिंप्री शिवारात एका हॉटेलमध्ये वास्तव्यास असलेल्या महिलेचा खून करून मृतदेहाची गुप्तपणे विल्हेवाट लावल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. फातिमा उर्फ आसमा शोयबउल्ला शेख (वय अंदाजे 25) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून, पोलीस तपासानंतर संशयित आरोपी कल्याण राजेंद्र पठारे (रा. बनपिंप्री) यास अटक करण्यात आली आहे. त्याचे इतर साथीदार सध्या पसार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. हा खून 17 मे पूर्वी झाल्याचा अंदाज आहे. या प्रकरणामुळे बनपिंप्री परिसरात एकच खळबळ उडाली असून, हॉटेलमधील अवैध कृत्ये, विदेशी महिलांची तस्करी व त्यातून घडणारे गंभीर गुन्हे यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या प्रकरणात ‘पंचवीस खोके आणि एकदम ओके’असा प्रकार झाला असल्याची चर्चा आहे.