Tuesday, September 17, 2024
Homeक्राईमप्रेम संबंधात अडथळा नको म्हणून पोटच्या मुलांचा केला खून

प्रेम संबंधात अडथळा नको म्हणून पोटच्या मुलांचा केला खून

अखेर आईसह प्रियकरावर गुन्हा दाखल || हिवरगाव पावसा येथील घटना

संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner

- Advertisement -

तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील रितेश व प्रणव सारंग पावसे या दोघा सख्ख्या भावांचा रामनवमीच्या (17 एप्रिल) दिवशी शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. मात्र, हा अकस्मात मृत्यू नसून ‘माता न तू वैरीण’ असलेल्या आईने आपल्या प्रेम संबंधात अडथळा नको म्हणून प्रियकराच्या मदतीने पोटच्या दोन गोळ्यांचा खून केल्याचे उघड झाले आहे. शेवटी संगमनेर तालुका पोलिसांनी बुधवारी (दि. 19 जून) आई आणि प्रियकरावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

रितेश व प्रणव पावसे दोघा भावांचा शेततळ्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. याप्रकरणी सुरुवातीला संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र त्यांचा मृत्यू शेततळ्यातील पाण्यात बुडून नव्हे तर त्यांचा घातपात करण्यात आला असल्याचा आरोप नातेवाईकांसह नागरिकांनी केला होता. त्यामुळे हे कृत्य करणार्‍यांची कसून चौकशी करून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. यासाठी पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे यांची भेट घेऊन त्यांना याबाबत सर्व माहिती देण्यात आली होती. परंतु, तपास होत नसल्याने संतप्त झालेल्या नातेवाईकांसह नागरिकांनी थेट जिल्हा पोलीस अधीक्षक यांना भेटून याबाबत निवेदनही दिले. पण तरीही काहीच उपयोग झाला नाही.

शेवटी संतप्त झालेल्या नातेवाईकांसह नागरिकांनी हिवरगाव पावसा टोलनाक्यावर एकत्रित येत रास्ता रोको आंदोलन केले. अखेर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून सखोल तपास केला असता आई कविता सारंग पावसे व प्रियकर सचिन बाबजी गाडे (रा. सावरगाव तळ, ता. संगमनेर) यांनी प्रेम संबंधात अडथळा नको म्हणून संगनमत करून तेथीलच डॉ. माधव गडाख यांच्या शेततळ्यात दोन्ही मुलांना टाकून खून केला असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी सुरेश बाबा पावसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तालुका पोलिसांनी आई आणि प्रियकरावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक देविदास यांची हे करत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या