नाशिक। प्रतिनिधी Nashik
आरटीओ ऑफिसलगतच्या अश्वमेघनगर येथे उसनवार पैशातून गरोदर महिलेवर चॉपरने वार करून निर्घृणपणे खून करणाऱ्या आरोपीला जन्मठेप तर त्यास पुरावा नष्ट करण्यास मदत करणाऱ्यास जिल्हा सत्र न्यायालयाने तीन वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा
पूजा विनोद आखाडे (२१, रा. मोरे मळा, काकडबाग, पंचवटी) असे खून झालेल्या महिलेचे नाव हाेते. तर, आदेश उर्फ आदि उर्फ सागर दिलीप भास्कर (रा. मोरे मळा, मखमलाबादरोड) असे जन्मठेपेची शिक्षा तर, विलास प्रकाश खरात (रा. म्हसोबावाडी, म्हसरुळगाव शिवार) असे पुरावा नष्ट करणाऱ्या आराेपीचे नाव आहे. आरोपी आदेश याने पूजा हिच्याकडून उसनवार पैसे घेतले होते. पूजाने आरोपीकडे पैशांची मागणी केली असता त्यांच्या वाद झाला. त्यातून १९ जानेवारी २०२१ रोजी रात्री पावणे बाराच्या सुमारास आरोपी आदेश याने त्याच्याकडील चॉपरने पूजाच्या शरीरावर वार केले. तसेच, ती गरोदर असल्याचे माहिती असूनही त्यांच्या पोटात चॉपर खुपसला. यात गंभीर झाल्याने तिचा मृत्यू झाला. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपी विलास याने हत्यारावरील रक्त पुसून नष्ट केले होते. म्हसरुळ पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल केला होता.
तत्कालीन सहायक निरीक्षक शिवाजी अहिरे, अंमलदार विशाल गायकवाड, जितेंद्र शिंदे यांनी तपास करीत जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. हा खटला जिल्हा सत्र न्यायालयाचे न्या. मलकापट्टी रेड्डी यांच्यासमोर चालला. सरकारपक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता सुलभा सांगळे यांनी साक्षीदार तपासून कामकाज पाहिले. आरोपींविरोधातील पुरावे सिद्ध झाल्याने न्यायालयाने आरोपी आदेश यास जन्मठेव व १० हजारांचा दंड, तर विलास यास तीन वर्षे सश्रम कारावास व ५ हजारांचा दंड ठोठावला आहे. पैरवी अधिकारी म्हणून सहायक उपनिरीक्षक दिनकर खैरनार, अंमलदार शांतराम जगताप यांनी पाठपुरावा केला.