बोरगाव | वार्ताहर Borgad
पळसन (ता. सुरगाणा) जवळील हातरुंडी येथील पातळी शिवारात बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास देवराम नाना गावित (६५) यांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचा खोटा बनाव करून खुन करणार्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलिस कोठडी मिळाली आहे. शिवराम गंगा गवळी (रा. पातळी) , रंगुबाई शिवराम गवळी असे ताब्यात घेतलेल्या दोन संशयितांचे नावे आहे. ते मृताचे व्याही असल्याचे समजते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित शिवराम याने बुधवारी रात्री गावात येत सांगितले की, देवराम गावितवर बिबट्याने हल्ला केला असून ते या हल्ल्यात ठार झाले आहे. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह पळसन आरोग्य केंद्रात आणले होते. बिबट्याने हल्ला केल्यामुळे बाहे वनपरिक्षेत्र कर्मचारी घटनास्थळी बिबट्याच्या पावलांचे ठसे शोधण्यासाठी परिसरात धांडोळा घेत होते. मात्र त्यांना ठसे आढळले नाही. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता संशयित खोटी माहिती देत असल्याचे जाणवले.
दरम्यान, वन भागाच्या कर्मचार्यांनी घरात झाडाझडती घेतली असता भिंतींवर रक्ताचे शिंतोडे उडाल्याचे दिसले. काही संशयास्पद वस्तू रक्ताने माखलेल्या आढळून आल्याने संशय अधिकच बळावला. मयताचा मुलगा हिरामण गावित यांच्या फिर्यादीवरून संशयितास ताब्यात घेण्यात आले. संशयितांच्या घरात पुरावे मिळून आल्यावर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले, त्यांना शुक्रवारी दिंडोरी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
काही तासांतच पोलिस निरीक्षक समाधान नागरे यांनी आपले तपास चक्र फिरवत आरोपींना गजाआड केल्याने तालुयातुन सुरगाणा पोलिसांचे कौतुक केले जात आहे. याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अण्णा साहेब दिघे, सहायक पोलिस निरीक्षक अंबादास बैरागी करीत आहेत.





