Friday, May 29, 2026
HomeराजकीयMurlidhar Mohol: केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ रुग्णालयात, पायावर शस्त्रक्रिया; एक महिना सक्तीची...

Murlidhar Mohol: केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ रुग्णालयात, पायावर शस्त्रक्रिया; एक महिना सक्तीची विश्रांती

पुणे । Pune

- Advertisement -

केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात आज यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. सुमारे २९ वर्षांपूर्वी कुस्तीच्या आखाड्यात झालेली एक जुनी दुखापत पुन्हा बळावल्याने डॉक्टरांनी त्यांना तातडीने शस्त्रक्रियेचा सल्ला दिला होता. या शस्त्रक्रियेनंतर मोहोळ यांना आता किमान महिनाभर विश्रांती घ्यावी लागणार असून, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

मोहोळ यांनी स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या या शस्त्रक्रियेबाबत आणि संघर्षाबाबत माहिती दिली. २९ वर्षांपूर्वी कोल्हापूर येथे कुस्ती खेळत असताना त्यांच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली होती. याच दुखापतीमुळे त्यांचे पैलवान होण्याचे आणि कुस्तीतील मोठे स्वप्न अधुरे राहिले होते. अनेक वर्षे त्यांनी या त्रासाकडे दुर्लक्ष केले होते; मात्र सार्वजनिक जीवनातील सततचा प्रवास, धावपळ आणि वाढत्या व्यापांमुळे ही जुनी दुखापत पुन्हा उफाळून आली. अखेर वैद्यकीय सल्ल्यानुसार त्यांनी ही शस्त्रक्रिया करून घेण्याचा निर्णय घेतला.

सध्या संसदेचे अधिवेशन सुरू असून, देशपातळीवरील जबाबदाऱ्या आणि पुणे लोकसभा मतदारसंघातील कामांचा मोठा डोंगर समोर असताना ही विश्रांती घ्यावी लागल्याने मोहोळ यांनी हळहळ व्यक्त केली आहे. “मला शारीरिक त्रासापेक्षा जनसेवेच्या कामात पडणाऱ्या या खंडामुळे अधिक त्रास होत आहे,” अशी भावूक प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच आगामी ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेच्या नियोजनाचा महत्त्वाचा टप्पा समोर असताना ही सक्तीची विश्रांती त्यांच्यासाठी आव्हानात्मक ठरणार आहे.

वैद्यकीय माहितीनुसार, शस्त्रक्रियेनंतर मोहोळ पुढील सात ते आठ दिवस रुग्णालयातच डॉक्टरांच्या देखरेखीखाली राहणार आहेत. त्यानंतर त्यांना घरी पूर्ण विश्रांती घेण्यास सांगण्यात आले आहे. महिनाभराच्या विश्रांतीनंतर ते पुन्हा एकदा नव्या दमाने जनसेवेसाठी सक्रिय होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, पुण्यातील राजकीय, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रातून त्यांच्या प्रकृतीसाठी मोठ्या प्रमाणात शुभेच्छांचा वर्षाव होत असून, ते लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना केली जात आहे.

मुरलीधर मोहोळ यांची सोशल मिडीया पोस्ट

क्षमस्व… पण एक महिन्याची सक्तीची विश्रांती ! २९ वर्षांपूर्वी… कोल्हापूर येथे कुस्ती खेळताना झालेली दुखापत, या दुखापतीमुळेच कुस्ती कायमची सुटली… इतकी वर्षे दुर्लक्ष केलं पण आता २९ वर्षांनंतर हळूहळू तो त्रास वाढू लागला, शेवटी डॅाक्टरांनी ह्या शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नसल्याचे सांगितलं. त्यामुळे किमान एक महिन्याकरता ही विश्रांती !

खरंतर संसदेचं अधिवेशन सुरू असतानाही शस्त्रक्रिया करावी लागली. अधिवेशन, कामानिमित्त देशभरातील प्रवास, माझ्या पुणे लोकसभा मतदारसंघातील नागरिकांशी संपर्क तसेच इतर कामे… आणि शिवाय यंदाची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा… या सगळ्याचं काय? दुखापतीच्या त्रासापेक्षा या सगळ्याचा त्रास जास्त होतोय. पण मला माहितीये तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वादच्या जोरावर मी लवकरच बरा होऊन महिन्याभरातच पुन्हा तुम्हा सर्वांच्या सेवेत हजर होईन, पहिल्यापेक्षा जास्त जोमाने…

ताज्या बातम्या

बिबट्याच्या हल्ल्यात दुचाकीस्वार जखमी

0
ओझे | वार्ताहर Oze लखमापूर परिसरात बिबट्याचे वारंवार दर्शन होत असल्याने शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दहेगाव येथील एका दुचाकीस्वारावर बिबट्याने अचानक हल्ला करत जखमी...