मुसळवाडी |वार्ताहर| Musalwadi
राहुरी तालुक्यातील मुसळवाडी येथे अशोक शेरकर यांच्या वस्तीवर दोन ते अडीच महिन्यांचा बिबट्याचा एक बछडा लिंबाच्या झाडावर मृत अवस्थेत आढळून आल्याने मुसळवाडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रविवारी रात्री दहाच्या सुमारास अशोक शेरकर हे शेतकरी रात्री आपल्या शेतातील बोरवेल चालू करण्यासाठी आपला मुलगा सोमनाथला सोबत घेऊन गेले असता त्यांना लिंबाच्या झाडात अडकलेला बिबट्याचा बछडा मृत अवस्थेत दिसला. अचानक बिबट्याचे पिल्लू दिसल्याने ते काही काळ घाबरून गोंधळून गेले. त्यांनी त्वरित सरपंच अमृत धुमाळ यांना घटनेची माहिती दिली. त्यांनी त्वरित वन खात्यास संपर्क साधून माहिती दिली.
त्यानंतर राहुरीचे वनपाल राजेंद्र रायकर यांनी भेट देऊन पंचनामा केला. या बिबट्याच्या बरोबर एक मादी व दोन बछडे असल्याचे अशोक शेरकर, सोमनाथ शेरकर, संजय सरमाने, सुभाष सजगुरे, तुकाराम घोलप, रमेश गल्हे, मुसळवाडीचे माजी उपसरपंच बदामराव भुजाडी यांनी प्रत्यक्ष पाहिल्याचे सांगितले. सदर बिबट्याच्या दर्शनाने व वास्तव्याने वाड्या वस्तीवरील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महिला मजूर वर्ग शेतात काम करण्यास घाबरत असून व रात्रीची शेतीची वीज असल्याने शेतकरी वर्ग रात्री आपले विद्युतपंप चालू करण्यासाठी घाबरत आहेत.
या बिबट्याने सुभाष सजगुरे, सोमनाथ शेरकर यांचे पाळीव कुत्रे खाल्ले तर संजय सरमाने यांच्या पाळीव कुत्र्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु सरमाने कुटुंबीय जागे झाल्याने त्यांनी व शेजारील वस्तीवरील ग्रामस्थांनी त्याला पिटाळले असता लगतच्या मकाच्या शेतात मादी व बछडे पळून गेले. तर महिन्यापूर्वी या बिबट्या मादीने पप्पू घोलप यांच्या दोन शेळ्या व एक पाळीव कुत्रे फस्त केले होते. बिबट्याने आतापर्यंत अनेक पाळीव कुत्रे, रान जनावरे, कालवडी, खाऊन फस्त केल्याने परिसरात ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वन विभागाने या बिबट्याचा पिंजरा लावून त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी. सरपंच अमृत धुमाळ, उपसरपंच किशोर जोशी, दगडू गल्हे, सोपानराव गल्हे, अशोक गल्हे, संदीप धुमाळ, हरिभाऊ सजगुरे, सुदाम भुजाडी, बाबासाहेब सोनवणे, भास्कर गल्हे, रावसाहेब भुजाडी, विलास माने, संजय गल्हे आदींसह ग्रामस्थांनी केली आहे.