Sunday, October 6, 2024
Homeनगरमुसळवाडी जलाशयात मे अखेर 42 टक्के जलसाठा शिल्लक

मुसळवाडी जलाशयात मे अखेर 42 टक्के जलसाठा शिल्लक

मुसळवाडी |वार्ताहर| Musalwadi

राहुरी तालुक्याच्या पूर्व भागातील सुमारे 20 ते 25 गावांना जलसंजीवनी देणार्‍या मुसळवाडी तलावाची जल साठवण क्षमता 189 एमसीएफटी घनफूट असून मे महिना अखेर 80.35 दशलक्ष घनफूट म्हणजेच 42.51 टक्के जलसाठा शिल्लक असल्याची माहिती अहमदनगर पाटबंधारे विभागाने दिली. मागील वर्षी निसर्गाच्या अवकृपेमुळे पाऊस न झाल्याने मुळा धरण पूर्ण क्षमतेने न भरल्याने मुसळवाडी तलावही पूर्ण क्षमतेने भरला नाही. त्यामुळे पूर्व भागातील पिण्याच्या पाणी योजना अडचणीत सापडून पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने मुसळवाडी तलावात जानेवारी अखेर 40 दशलक्ष घनफूट म्हणजेच अवघा 28 टक्के नीचांकी पाणीसाठा शिल्लक होता.

- Advertisement -

त्यामुळे या भागातील शेतकरी आपले वर्षभरातील पिकाचे नियोजन पाण्याअभावी कोलमडते की काय? या चिंतेत होते. मुसळवाडी जलाशयातून पाणीपुरवठा करणार्‍या मुसळवाडीसह नऊ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, टाकळीमिया, मोरेवाडी, लाख, दरडगाव, जातप, त्रिंबकपूर, महाडूक सेंटर, माहेगाव, मालुंजे खुर्द, महालगाव, खुडसरगाव, पाथरे खुर्द, शेनवडगाव, कोपरे, वांजुळपोई, तिळापूर, बोरीफाटा, मांजरी या भागातील पिण्याच्या पाणी योजना अडचणीत सापडल्या होत्या. तसेच शेतीच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला होता. त्यामुळे पूर्व भागातील शेतकर्‍यांनी व ग्रामस्थांनी संबंधित लोकप्रतिनिधी व पाटबंधारे विभागाकडे अनेकवेळा पाठपुरावा करून मुसळवाडी तलाव पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी शासनाकडे आग्रही मागणी केली होती. त्यावर या भागातील परिस्थितीचा शासन पातळीवर गांभीर्याने विचार होऊन मुसळवाडी तलावात पाणी सोडण्याचा निर्णय झाला होता.

कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे, उपअभियंता ए. एच. गीते, शाखाधिकारी सुधाकर सुरुणकर, जी.एन. सिनारे, जावेद सय्यद व कर्मचार्‍यांनी नियोजन करून मुळा धरणातून जानेवारीमध्ये शेतीसाठी सोडलेल्या आवर्तनातून सात ते आठ दिवसाच्या कालावधीत मुळा डाव्या कालव्यातून 210 क्यूसेसने मुसळवाडी तलावात पाणी घेतले होते. त्यामुळे 100 दशलक्ष घनफूट म्हणजेच 46 टक्के नवीन पाणी सोडून पूर्वीचे 40 दशलक्ष घनफूट म्हणजेच 28 टक्के असे मिळून एकंदर फेब्रुवारी अखेर 140 दशलक्ष घनफूट म्हणजेच 74 टक्के पाणीसाठा झाला होता. त्यामुळे या भागातील पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न काही अंशी मिटला होता.

मुसळवाडी जलाशयातून सन 2024 या हंगामा मध्ये खरिपाचे एक आवर्तन तर रब्बी साठी एक आवर्तन व उन्हाळी पिकासाठी एक आवर्तन असे एकंदर तीन आवर्तने शेती पिकासाठी देण्यात आली. उन्हाची तीव्रता लक्षात घेता पाऊस लांबला तर भविष्यात पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण होऊ नये. या दृष्टीने सध्याचा उपलब्ध पाणीसाठा पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवण्यात आला असल्याचे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी सांगितले. दरम्यान परिसरातील अनेक शेतकरी 20 मे नंतर कपाशी लागवड करीत असतात. परंतु सध्याची उन्हाची तीव्रता पाहता कुणीही शेतकरी कपाशी लागवडीचे धाडस करीत नसल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे खरिपाची पेरणी व लागवडीसाठी दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या