मुंबई | Mumbai
राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले असून महायुती तसेच महाविकास आघाडीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने राज्यातील दोन्ही प्रमुख आघाड्यांनी विधानसभेच्या निवडणुकीसाठी खास रणनीती आखायला सुरवात केली आहे. त्यानुसार मंत्र्यांच्या बैठकांचा सिलसिला सुरु आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर महायुतीची महत्वाची बैठक पार पडली. तर महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांसोबत बैठका झाल्याचे पहायला मिळत आहे.
महायुती विरुद्ध महाविकास आघाडीसाठी दोघांनीही दंड थोपटलेले पाहायला मिळत आहेत. महायुतीच्या पाठोपाठ महाविकास आघाडीनेही आता राज्यभर सभा बैठका संवाद यात्रा सुरू करणार आहे. महाविकास आघाडी १६ ऑगस्टला प्रचाराचा नारळ फोडणार आहे तर महायुती २० ऑगस्टला आपला प्रचार सुरू करणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर महायुतीकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु झाली असून काल वर्षा बंगल्यावर महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली असून प्रचाराची खास रणनीती आखण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. सभा, रॅली, मेळावे यांमधून महायुती संपुर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याची माहिती आमदार प्रसाद लाड यांनी दिली.
तसेच, २० ऑगस्टला काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईतल्या बीकेसीत सभा पार पडणार आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाची शिवनेरीवरून आजपासून शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात झालेली आहे. तर उद्यापासून काँग्रेस पक्षाचे नेते मराठवाड्याच्या दौऱ्यावरती असून प्रभारी रमेश चन्नीथला हेही उपस्थित असणार आहेत. मराठवाड्यातील जागा वाटपांच्या चाचणीसह प्रचारांच्या छोट्या-मोठ्या सभा पार पडणार आहेत.
तर इकडे शिवसेना उध्दव ठाकरे गटाच्या वतीने उध्दव ठाकरे ठाण्यात शिंदेंच्या बालेकिल्ल्यात मेळावा घेणार आहे. मविआच्या वतीने १६ ऑगस्टपासून प्रचार सभेचा नारळ फुटणार आहे आणि थेट वीस तारखेला प्रचारासाठी राहुल गांधी आणि मलिकार्जुन खर्गे मुंबईत येत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीने चांगलीच कंबर असलेले आहे. याला प्रतिउत्तर देण्यासाठी महायुती सुद्धा २० ऑगस्टपासून राज्यभरामध्ये संवाद दौरा करत आहे.
याशिवाय एक संवाद दौरा, लाभार्थी दौरा आणि प्रत्येक विधानसभेत एक सभा घेण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या एकत्रित सात सभा राज्यभरात होणार आहेत. तर आठवी आणि शेवटची सभा ही मुंबईत होणार आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा