Monday, May 27, 2024
Homeनाशिकमविप्र निवडणूक : उद्या 'इतके' मतदार बजावणार हक्क

मविप्र निवडणूक : उद्या ‘इतके’ मतदार बजावणार हक्क

नाशिक । प्रतिनिधी Nashik

मविप्र निवडणुकीसाठी ( MVP Elections )जिल्ह्यात 14 ठिकाणी 53 केंद्रांवर 53 बूथवर 10,196 मतदारांना हक्क बजावता येणार आहे. रविवारी (दि. 28) मतदान तर सोमवारी (दि.29) मतमोजणी होणार आहे. त्यासाठी प्राधिकृत केलेल्या सेवकांना मविप्र निवडणूक मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड.भास्करराव चौरे यांनी मार्गदर्शन केले.

- Advertisement -

मविप्र समाज शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सोमवारी (दि.29) मराठा हायस्कूल शेजारील कै.तुकाराम रौंदळ सभागृहात मतमोजणी होणार आहे. त्यासाठी प्राधिकृत केलेल्या सेवकांना पंप निवडणूक मंडळाचे सचिव डॉ.डी. डी. काजळे, संस्थेचे ए. टी. खालकर, नवले व्यासपिठावर उपस्थित होते.

सकाळी 8 वाजेला मतमोजणी प्रक्रियेस प्रारंभ होईल.पहिल्या फेरीत कुठलीही मतमोजणी होणार नाही तर रंगनिहाय मतपत्रिका वेगवेगळ्या करुन 50 पत्रिकांचा गठ्ठा तयार केला जाईल. एकूण सहा रंगाच्या मतपत्रिका असल्या तरी काही रंग हे मिळते जुळते असल्याने त्या-त्या रंगाची मतपत्रिका वेगळी करण्याची काळजी घ्यावी. जिल्ह्यात एकूण 53 बुथ आहेत. त्यांना मतदान केंद्रनिहाय क्रमांक निश्चित केला आहे. पहिल्या फेरीत फक्त मतपत्रिका वेगळ्या केल्या जातील, त्यामुळे कुठल्याही स्वरुपाचा कल लक्षात येणार नाही, याची काळजी प्रत्येकाने घ्यायची आहे.

मतपत्रिकेतील मतदान बघायचे नाही किंवा उमेदवारांच्या निरीक्षकांना दाखवायचे नाही, अशा स्पष्ट सूचनाही त्यांनी दिल्या. दुसर्या फेरीत प्रत्यक्ष मतदान मोजणीस प्रारंभ होईल. एका वेळी एका टेबलवर 50 मतदान बंदिस्त असलेले 20 गठ्ठे अशा एकूण एक हजार मतपत्रिका मोजणीसाठी दिल्या जाणार आहेत. प्रत्येक मतपत्रिका समोरील प्रतिनिधींना दाखवूनच त्यांच्या ट्रेमध्ये टाकल्या जातील. डॉ.काजळे म्हणाले की, प्रत्येक कर्मचार्याने त्याला नेमून दिलेले काम बिनचूक पध्दतीने केल्यास निवडणूक प्रक्रिया वेळेत आणि पारदर्शकपणे पार पडेल. त्यामुळे सर्व कर्मचार्‍यांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.

सोमवारी मविप्र शाळांना सुटी

मतदान व मतमोजणीसाठी मविप्रच्या सेवकांची नियुक्त केल्यामुळे शाळांना सोमवारी (दि.29) सुटी देण्याचा निर्णय संस्थेच्या प्रशासनाने घेतला आहे. मविप्र वार्षिक सर्वसाधारण सभाही याच दिवशी होत असल्याने त्यानिमित्त सर्व शाखांना सुटी देण्यात आल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, मविप्र संस्थेतील बहुतांश सेवक सध्या मतदान व मतमोजणी प्रक्रियेत सहभागी आहेत. निवडणूक मंडळातर्फे त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले जात आहे. त्यासाठी सेवकांना उपस्थित रहावे लागत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून एक दिवस शाळेला सुटी देण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे. मंगळवार (दि. 30) पासून सर्व शाळा, महाविद्यालये नियमितपणे सुरु होतील.

- Advertisment -

ताज्या बातम्या