Sunday, March 30, 2025
Homeशब्दगंधमायबाप ‘नूतन’चा सुवर्ण महोत्सव

मायबाप ‘नूतन’चा सुवर्ण महोत्सव

व्यक्तीने वयाची पन्नाशी गाठली की, त्याची वाटचाल ही वानप्रस्थाश्रमाकडे अर्थात वृध्दत्वाकडे सुरू होऊ लागते. शासनाच्या नियमानुसार 58 वर्ष पूर्ण झाले तर तो नोकरीतून निवृत्त होत असतो. आणि वयाची साठ वर्ष पूर्ण केली की ‘ साठी बुध्दी नाठी’ असे उपरोधीकपणे म्हटले जाते. हे असे असले तरी हा नियम मात्र संस्थांबाबत अपवाद ठरतो. कारण एखाद्या शिक्षण संस्थेने ‘पन्नाशी’ गाठणे म्हणजे त्या संस्थेच्या प्रगतीचा आलेख उंचावलेला असतो. अनेक अडचणी, समस्यांना सामोरे जात संस्था प्रगतीपथावर नेण्याचे काम येथील सहकारी मोठ्या निष्ठेने, आत्मीयतेने करत असतात आणि म्हणूनच अशा संस्था वयाची आणि प्रगतीची पन्नाशी गाठत असतात. जळगाव जिल्ह्यातच नव्हे तर उत्तर महाराष्ट्रात बोटावर मोजता येतील अशा शैक्षणिक संस्थांनी सुवर्ण महोत्सवात पदार्पण केलेले आहे. यात एक नाव म्हणजे ‘नूतन’

उत्तर महाराष्ट्रात ‘नूतन’ एवढा शब्द जरी उच्चारला तरी ऐकणार्‍याच्या मनात आपोआप ‘ मराठा कॉलेज’ हे शब्द उमटतात. तसे पाहीले तर ‘ नूतन’ हे या कॉलेजचे मूळ नाव नसले तरी टोपण नाव मात्र नक्की आहे. श्री एस.एस. पाटील कला, श्री.भाऊसाहेब टी.टी. साळूंखे वाणिज्य आणि श्री.आर.पंडीत विज्ञान महाविद्यालय, जळगाव असे नाव या महाविद्यालयाचे आहे. परंतू ‘ नूतन’ या टोपन नावानेच ते प्रचलीत आहे. कारणही तसेच आहे. ‘नूतन’ मराठा असे म्हटले ही मायबाप कॉलेज अशीही वेगळी ओळख या कॉलेजला जनतेने दिलेली आहे. अशा या ‘मायबाप’ कॉलेजचा सुवर्ण महोत्सव म्हटला की ‘नूतन’च्या विद्यार्थी, प्राध्यापक, संस्थाचालक, प्राचार्य यांचा ‘ऊर’ नक्कीच भरून आल्याशिवाय राहणार नाही. भलेही ते कॉलेजच्या कॅम्पसच्या बाहेर असतील.

आपल्या कॉलेजचा सुवर्ण महोत्सव साजरा होत आहे याची माहिती होताच अनेक विद्यार्थ्याच्या मनात त्यांनी या कॉलेज कॅम्पसमधील आठवणींचा हिंदोळा झूलू लागतो. कॉलेजचा कट्टा, तो वर्ग, तो बाक, ते प्राध्यापक,प्राचार्य, वर्ग मित्र, ते ग्रंथालय, ते शिक्षकेत्तर कर्मचारी आणि हो…. मनाच्या त्या नाजुक, गुलाबी कोपर्‍यात बसलेली ‘ती’ प्रेयसी… अशा कितीतरी आठवणींचा मोरपिसारा अलगद फिरतो अन् अंग शहारत..

- Advertisement -

असे हे मायबाप कॉलेज. माझ्या माहितीनुसार कॉलेजला मायबाप कॉलेज म्हणून ओळखले जाणारे नूतन मराठा हे एकमेव कॉलेज असावे. मराठा समाजातील तत्कालीन धुरींधरांनी एकत्र येत या शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्या काळी उच्चशिक्षणासाठी पुण्यास जावे लागे. परिणामी मराठा समाजातील अनेक युवक युवतींना आर्थिक कारणास्तव ते शक्य होत नव्हते. मग श्री. एस.एस. पाटील, श्री. भाऊसाहेब टी.टी. साळुंखे,श्री.जी. आर. पंडीत यांच्यासारख्या शिक्षणप्रेमींनी सध्या अस्तिवात असलेली जागा संस्थेच्या नावावर विनामोबदला करून दिली.आणि येथेच नूतन मराठा महाविद्यालयाची 1972 मध्ये मूहूर्तमेढ झाली. पहिले प्राचार्य होते राम शिंदे. 14 ते 15 विद्यार्थी घेवून नूतन मराठा कॉलेज सुरू झाले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन प्राध्यापकांनी अध्यापनास सुरवात केली. त्यानंतर श्री. सनतकुमार भोरे हे दुसरे प्राचार्य झाले.

त्यानंतर तीसरे प्राचार्य होण्याचा बहुमान प्राचार्य डॉ.(स्व.) के. आर. सोनवणे यांना मिळाला. प्राचार्य डॉ. सोनवणे यांच्या निवृत्तीनंतर प्रभारी प्राचार्य म्हणून प्रा. माळी यांनी काम पाहीले. प्रा. माळी यांच्यानंतर प्रभारी प्राचार्य म्हणून प्रा. व्ही.एस. पाटील यांनी कॉलेजची धुरा सांभाळली. त्यानंतर प्राचार्य डॉ. अजित वाघ यांच्याकडे कॉलेजची धुरा सोपवण्यात आली. प्राचार्य वाघ निवृत्त झाल्यानंतर प्रा.डॉ.(स्व.) बी. बी. देशमूख हे प्राचार्य झाले. त्यांच्यानंतर प्रा. प्रकाश भावसार व प्रा.डॉ. शकुंतला चव्हाण यांच्याकडे प्रभारी प्राचार्यपदाची धुरा सोपवण्यात आली. यानंतर सन 2010 पासून प्रा.डॉ. एल.पी. देशमुख यांच्याकडे प्राचार्य पदाची धुरा सोपवण्यात आली. ती धुरा या सर्व प्राचार्यांनी यशस्वीपणे पेलत कॉलेजच्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख उंचावतच नेला.

भविष्यातही ‘नूतन’ मायबापच वाटेल… 1972 ला कॉलेजची सुरवात झाली. आज 2022 म्हणजे कॉलेजचे सुवर्णमहोत्सवी वर्ष. 14 विद्यार्थ्यांवर सुरू झालेल्या कॉलेजची आजची विद्यार्थी संख्या साडेसात हजारावर गेलेली आहे. सुवर्णमहोत्सव वर्ष आम्ही जरी साजरी करत असलो तरी त्यामागे सर्व संस्थाचालक, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे योगदान मोलाचे आहे. त्या काळी विद्यार्थी असलेले पुढे याच महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करू लागले. त्यामुळे या सर्वांमध्ये कॉलेजच्या प्रगतीबाबत तळमळ होती. त्याचेच हे फलित म्हणजे महाविद्यालयाचा सुवर्ण महोत्सव. तळागाळातील, शेतकरी, ग्रामिण भागातील, मोलमजुरी करणारे या महाविद्यालयातून शिक्षण घेत आज विविध ठिकाणी मोठ्या पदावर कार्यरत आहेत. संस्थेचे ब्रिद वाक्यच आहे ’बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ या नुसार कॉलेज गेल्या पन्नास वर्षापासून काम करत आहे. वंचीत विद्यार्थ्याना या कॉलेजमध्ये सहज प्रवेश मिळतो. याची एक मोठी पावती म्हणजे आमचा एक विद्यार्थी दस्तीगरी शेख हा नासात संशोधक म्हणून काम करत आहे. तर एक विद्यार्थी श्री. उपाध्ये हा इन्फोसिस या आंतराष्ट्रीय संस्थेत सिनीअर डायरेक्टर म्हणून काम करत आहे. त्यांचा आम्हाला अभिमान आहे. प्राचार्य डॉ. के. आर. सोनवणे यांनी 30 वर्ष प्राचार्य म्हणून सेवा दिली. यात त्यांनी महाविद्यालयाला एक नवी दिशा दिली. एकूण या सर्व प्राचार्यानी कॉलेजला प्रगतीपथावर नेले. कोरोना काळात ऑनलाईन प्रवेश ते ऑनलाईन परिक्षा घेण्याचा सर्व प्रथम बहुमान या कांलेजने मिळवला आहे. आता कॉलेज पुर्णपणे डिजीटलाईज्ड झाले आहे. शैक्षणिक शुल्क हे ऑनलाईनच घेतले जाते. कागद ते डिजीलायटेशन अशी प्रगती या महाविद्यालयाने या पन्नास वर्षात केली आहे. यामागे संस्थाचालक,प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांचे मोलाचे योगदान आहे. विद्यापीठास क्रीडा क्षेत्रात अनेक सुवर्ण पदके मिळवून देण्यात नूतनच्या विद्यार्थ्यांचा मोलाचा वाटा आहे. सांस्कृतीक क्षेत्रात हलगी सम्राट हे नाटक आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचले आहे. अनेक पारितोषीके या नाटकाने मिळविली आहेत. भविष्यातील विविध आवाहने पेलत शैक्षणिक आलेख उंचावत राहणार आहे. भविष्याची पावले ओळखत औद्योगीक क्षेत्रात लागणारे तंत्रज्ञान व मनुष्यबळ उपलब्ध कसे होईल असे व्यावसायीक अभ्यासक्रम सुरू करणार आहोत. संस्थेच्या ब्रिदनुसार भविष्यातही नूतन मराठा हे बहुजनांना आपले मायबाप कॉलेज वाटेल या दृष्ट्रीने प्रयत्न राहणार असल्याचा विश्वास सिनेट सदस्य तथा प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख यांनी ‘ देशदूत’ शी बोलतांना व्यक्त केला.

प्राचार्य डॉ. सोनवणे आणि मायबाप कॉलेज

नूतन मराठा कॉलेजला मायबाप ही नवी ओळख दिली ती स्व. प्राचार्य डॉ. के. आर. सोनवणे यांनी. त्या काळात जिल्ह्यात असलेल्या विविध महाविद्यालयात वाणिज्य आणि विज्ञान शाखेत केवळ गुणवत्तेच्या जोरावर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येत असे. मेरीटच्या जंज़ाळामुळे आणि शैक्षणिक शुल्कामुळे अनेक गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना इच्छा असूनही वाणिज्य आणि विज्ञान शाखेत प्रवेश मिळत नव्हता. अशा गरीब, होतकरू आणि बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना ही संधी दिली. 35 टक्के गुण मिळवणार्‍या विद्यार्थ्यांला शे-दोनशे रूपयात प्रवेश दिला. कारण प्राचार्य डॉ. के. आर. सोनवणे हे मूळातच चाळीसगावच्या कळमडू सारख्या ग्रामिण भागातून आलेले होते. त्यामुळे ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना आपल्या संस्थेत कमी शुल्कात त्याला हव्या असलेल्या शाखेत प्रवेश देण्याचा नवा पायंडा प्राचार्य डॉ. सोनवणे यांनी सुरू केला. त्यांना संस्थाचालकांनी उत्तम साथ दिली. त्यामुळे आजही ज्या विद्यार्थ्यांला जिल्ह्यातील नामवंत महाविद्यालयात प्रवेश मिळत नाही त्याला ‘ नूतन’ मराठात नक्कीच प्रवेश मिळत असे. यातूनच कॉलेजला ‘मायबाप’ कॉलेज अशी नवी ओळख मिळाली. ती आजही कायम आहे. ‘ नूतन’ मराठा महाविद्यालयाचे प्रदीर्घ असे प्राचार्य म्हणून डॉ. के. आर. सोनवणे यांना संधी मिळाली. तब्बल तीस वर्ष त्यांनी प्राचार्य म्हणून कॉलेजचा नावलौकिक वाढविला. विविध विद्याशाखा सुरू केल्यात.

प्राचार्य डॉ. के. आर. सोनवणे यांच्यानंतर आलेले प्राचार्य माळी, प्रा. व्ही.एस. पाटील, प्राचार्य डॉ. अजित वाघ, (स्व.)प्रा. डॉ. बी. बी. देशमुुख, प्रभारी प्राचार्य प्रकाश भावसार, प्रा.डॉ. शकुंतला चव्हाण यांनीही शैक्षणिक गुणवत्तेच्या नावलौकिकात भरच टाकली.

त्यांच्यानंतर प्राचार्य डॉ. एल.पी. देशमुख यांच्याकडे ही धुरा आली. प्रा. देशमुख हे याच महाविद्यालयाचे विद्यार्थी. महाविद्यालयाचे विद्यार्थी ते महाविद्यालयाचे प्राचार्य असा त्यांचा प्रवास खरोखरच कौतुकास्पद आहे. कॉलेजचा विद्यार्थी त्याच कॉलेजमध्ये प्राध्यापक आणि प्राचार्य होऊ शकतात हे या नूतन मराठा कॉलेजने सिध्द केलेयं. यातच कॉलेजच्या शैक्षणिक गुणवत्तेची ओळख अधोरखीत होते. कॉलेजने अनेक गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना घडविले आहे. त्यांना घडविण्यात प्राचार्य, प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे योगदान अविस्मरणीयच.

कॉलेज मायबाप असले तरी शैक्षणिक गुणवत्तेत मात्र कॉलेज, प्राध्यापक, विद्यार्थी कोठेही कमी पडलेले नाहीत. अशा नूतन मराठा महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवास हार्दिक शुभेच्छा !

(लेखक नूतन मराठा महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी विद्यापीठ प्रतिनिधी आहेत.)

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Shirdi : साईंच्या पादुका बाहेर नेण्यास काही ग्रामस्थांचा विरोध तर काहींचा...

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi येथील साईबाबांच्या मुळ चर्म पादुका साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या वतीने 10 एप्रिलपासून दक्षिण भारतात नेण्याचा निर्णय घेतला आहे. पंधरा दिवसात पादुका दोन...